GuruCharitra.in

श्रीगुरुचरित्र अध्याय पहिला | Guru Charitra Adhyay 1

गुरुचरित्र अध्याय 1 में गुरु की महिमा और भक्ति के महत्व का वर्णन है। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु ही हमारे जीवन के सबसे महत्वपूर्ण मार्गदर्शक हैं और हमें उनकी शरण में जाना चाहिए। गुरु की भक्ति करने से हमें जीवन में सभी तरह की सफलता प्राप्त होती है और हम आध्यात्मिक उन्नति कर पाते हैं। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक गुरु अपने शिष्यों को जीवन की सही राह पर चलने की शिक्षा देते हैं। गुरु अपने शिष्यों को बताते हैं कि जीवन का सच्चा अर्थ ईश्वर की प्राप्ति है और हमें इसके लिए प्रयास करना चाहिए। गुरु अपने शिष्यों को यह भी सिखाते हैं कि हमें सभी प्राणियों के प्रति करुणा और दया का व्यवहार करना चाहिए।

॥ ॐ ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः॥

श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्गुरुभ्यो नमः ॥

अथ ध्यानम्

बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङगरागोज्ज्वलं

शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ।

ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं

दत्तात्रेयमुपास्महे ह्रदि मुदा ध्येयं सदा योगिभिः ॥

ॐ नमो जी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा ।

जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥


हालविसी कर्णयुगुलें । तेथूनि जो का वारा उसळे ।

त्याचेनि वातें विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥ २ ॥


तुझें शोभे आनन । जैसे तप्तकांचन ।

किंवा उदित-प्रभारमण । तैसेम तेज फांकतसे ॥ ३ ॥


विघ्नकानन च्छेदनासी । हाती फरश धरिलासी ।

नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥ ४ ॥


चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका ।

प्रतिपाळिसी विश्र्वलोकां निर्विघ्नेंकरुनि ॥ ५ ॥


तुझें चिंतन जे करिती । तयां विघ्नें न बाधती ।

सकळाभीष्टें लाधती । अविलंबेंसीं ॥ ६ ॥


सकळ मंगल कार्यांसी । प्रथम वंदिजे तुम्हांसी ।

चतुर्दश-विद्यांसी । स्वामी तूंचि लंबोदरा ॥ ७ ॥


वेद शास्त्रें पुराणें । तुझेचि असे लेखन ।

ब्रह्मादिकीं याकारणें । स्तविलें असे सुरवरीं ॥ ८ ॥


त्रिपुर-साधन करावयासी । ईश्र्वरे अर्चिलें तुम्हांसी ।

संहारावया दैत्यांसी । पहिलें तुम्हांसी स्तविलें ॥ ९ ॥


हरि ब्रह्मादिक गणपती । कार्यारंभीं वंदिती ।

सकळाभीष्टें साधती । तुझेनि प्रसादें ॥ १० ॥


कृपानिधी गणनाथा । ॐकारा विघ्नहर्ता ।

विनायका अभयदाता । मतिप्रकाश करीं मज ॥ ११ ॥


समस्त गणांचा नायक । तूंचि विघ्नांचा अंतक ।

तूंतें वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचें ॥ १२ ॥


सकळ कार्यांचा आधारु । तूंचि कृपेचा सागरु ।

करुणानिधि गौरीकुमरु । मतिप्रकाश करीं मज ॥ १३ ॥


माझे मनींची वासना । तुवां पुरवावी गजानना ।

साष्टांग करितों नमना । विद्या देई मज आतां ॥ १४ ॥


नेणता होतों मतिहीन । म्हणोनि धरिले तुझे चरण ।

चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ॥ १५ ॥


माझे अंतःकरणींचें व्हावें । गुरुचरित्र कथन करावें ।

पूर्णदृष्टीनें पहावें । ग्रंथसिद्धि पाववीं दातारा ॥ १६ ॥


आतां वंदूं ब्रह्मकुमारी । जिचें नाम ‘ वागीश्र्वरी ‘ ।

पुस्तक वीणा जिचे करीं । हंसवाहनी असे देखा ॥ १७ ॥


विद्यावेदशास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेसी ।

तिये वंदितां विश्र्वासी । ज्ञान होय अवधारा ॥ १८ ॥


म्हणोनि नमितों तुझे चरणीं । प्रसन्न व्हावें मज स्वामिणी ।

राहोनियां माझिये वाणीं ग्रंथीं रिघू करीं आतां ॥ १९ ॥


ऐक माझी विनंति । द्यावी आतां अवलीला मति ।

विस्तार करावया गुरुचरित्रीं । मतिप्रकाश करीं मज ॥ २० ॥

जय जय वो जगन्माते । तूंचि विश्र्व-वाग्देवते ।

वेदशास्त्रें तुझीं लिखितें । नांदविशी येणेंपरी ॥ २१ ॥

माते तुझिया वाणीं । उत्पत्ति वेदपुराणीं ।

वदतां साही दर्शनीं । त्यांतें अशक्य परियेसा ॥ २२ ॥

गुरुचे नामीं तुझी स्थिति । म्हणती ‘ नृसिंह-सरस्वती ‘ ।

याकारणें मजवरी प्रीति । नाम आपुलें म्हणोनि ॥ २३ ॥

खांबसूत्रींचीं बाहुलीं जैशीं । खेळती तया सूत्रासरशीं ।

स्वतंत्रबुद्धि नाहीं त्यांसी । वर्तती आणिकाचेनि मतें ॥ २४ ॥

तैसें तुझेनि अभिमतें । माझे जिव्हे प्रेरीं माते ।

कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥ २५ ॥

म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावें स्वामिणी प्रसन्न ।

द्यावें मातें विद्यादान । ग्रंथी रिघू करीं आतां ॥ २६ ॥

आतां वंदूं त्रिमूर्तीसी । ब्रह्माविष्णुशिवांसी ।

विद्या मागेन मी तयांसी । अनुक्रमेंकरोनि ॥ २७ ॥

चतुर्मुखें असती ज्यासी । कर्ता जोका सृष्टीसी ।

वेद झाले ज्याचे मुखेंसीं । त्याचे चरणीं नमन माझें ॥ २८ ॥

आतां वंदूं ह्रषीकेशी । जो नायक विश्र्वासी ।

लक्ष्मीसहित अहर्निशी । क्षीरसागरीं असे जाणा ॥ २९ ॥

चतुर्बाहु नरहरी । शंख चक्र गदा करीं ।

पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥ ३० ॥

पीतांबर असे कासेला । वैजयंती माळा गळा ।

शरणांगतां अभीष्ट सकळां । देता होय कृपाळू ॥ ३१ ॥

आतां नमूं शिवासी । धरिली गंगा मस्तकेंसीं ।

पंचवक्त्र दशभुजेंसीं । अर्धांगीं असे जगन्माता ॥ ३२ ॥

पंचवदनें असतीं ज्यासी । संहारी जो या सृष्टीसी ।

म्हणोनि बोलती ‘ स्मशानवासी ‘। त्याचे चरणीं नमन माझे ॥ ३३ ॥

व्याघ्रांबर पांघरुण । सर्वांगीं असे सर्पवेष्टन ।

ऐसा शंभु उमारमण । त्याचे चरणीं नमन माझें ॥ ३४ ॥

नमन समस्त सुरवरां । सिद्धसाध्यां अवधारा ।

गंधर्वयक्षकिन्नरां । ऋषीश्र्वरां नमन माझें ॥ ३५ ॥

वंदूं आतां कविकुळासी । पराशरादि व्यासांसी ।

वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ॥ ३६ ॥

नेणें कवित्व असे कैसे । म्हणोनि तुम्हां विनवितसें ।

ज्ञान द्यावें जी भरवसें । आपुला दास म्हणोनि ॥ ३७ ॥

न कळे ग्रंथप्रकार । नेणें शास्त्रांचा विचार ।

भाषा न ये महाराष्ट्र । म्हणोनि विनवीं तुम्हांसी ॥ ३८ ॥

समस्त तुम्ही कृपा करणें । माझिया वचना साह्य होणे ।

शब्दव्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥ ३९ ॥

ऐसें सकळिकां विनवोनि । मग ध्यायिले पूर्वज मनीं ।

उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥ ४० ॥

आपस्तंबशाखेसीं । गोत्र ‘ कौंडिण्य ‘ महाऋषि ।

‘ साखरे ‘ नाम ख्यातीसी । सायंदेवापासाव ॥ ४१ ॥

त्यापासूनि ‘ नागनाथ ‘ । ‘ देवराव ‘ तयाचा सुत ।

सदा श्रीसद्गुरुचरण ध्यात । ‘ गंगाधर ‘ जनक माझा ॥ ४२ ॥

नमन करितां जनकचरणीं । मातापूर्वज ध्याये मनीं ।

जो कां पूर्वज नामधारणीं । आश्र्वलायन शाखेसी ॥ ४३ ॥

काश्यपाचे गोत्रीं । ‘ चौंडेश्र्वरी ‘ नामधारी ।

रागें जैसा जन्हु अवधारीं । अथवा जनक गंगेचा ॥ ४४ ॥

त्याची कन्या माझी जननी । निश्र्चयें जैशी भवानी ।

‘ चंपा ‘ नामें म्हणोनि । स्वामिणी माझी परियेसा ॥ ४५ ॥

नमितां जनकजननींसी । अनंतर नमों श्रीगुरुसी ।

झाली मति प्रकाशीं । गुरुचरण स्मरावया ॥ ४६ ॥

गंगाधराचे कुशीं । जन्म झाला परियेसीं ।

सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावें निरंतर॥ ४७


म्हणोनि ‘ सरस्वती-गंगाधर ‘ । करी संतांसी नमस्कार ।

श्रोतयां विनवी वारंवार । क्षमा करणें बाळकासी ॥ ४८ ॥

वेदाध्यायी संन्यासी । यती योगेश्र्वर तापसी ।

सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥ ४९ ॥

विनवीतसें समस्तांसी । अल्पमती आपणासी ।

माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगीकारा ॥ ५० ॥

तावन्मात्र माझी मति । नेणें काव्यव्युत्पत्ति ।

जैसें श्रीगुरु निरोपिती । तेणेपरी सांगतसें ॥ ५१ ॥

पूर्वापार आमुचे वंशी । गुरु प्रसन्न अहर्निशी ।

निरोप देती मातें परियेसीं । ‘ चरित्र आपुलें विस्तारीं ॥ ५२ ॥

म्हणे ‘ ग्रंथ कथन करीं । अमृतघट स्वीकारीं ।

तुझे वंशपारंपरीं । लाधती चारी पुरुषार्थ ॥ ५३ ॥

श्रीगुरुवाक्य मज कामधेनु । मनीं नाहीं अनुमानु ।

श्रेयवृद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥ ५४ ॥

त्रैमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।

कवण जाणे याचा पार । चरित्र कवणें वर्णावें ॥ ५५ ॥

चरित्र ऐसें श्रीगुरुचें । वर्णावया शक्ति कैंची वाचे ।

आज्ञा असे श्रीगुरुची । म्हणोनि वाचें बोलतसें ॥ ५६ ॥

ज्यास पुत्रपौत्रीं चाड । त्यासी हे कथा असे गोड ।

लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनीं परियेसा ॥ ५७ ॥

ऐशी कथा जयांचे घरीं । वाचिती नित्य मनोहरी ।

श्रियायुक्त निरंतरीं । नांदती कलत्रपुत्रयुक्त ॥ ५८ ॥

रोगराई तया भुवनीं । नव्हती गुरुकृपेंकरोनि ।

निःसंदेह सात दिनीं । ऐकतां बंधन तुटे जाणा ॥ ५९ ॥

ऐशी पुण्यपावन कथा । सांगेन ऐका विस्तारता ।

सायासाविण होय साध्यता । सद्यः फल असे देखा ॥ ६० ॥

निधान लाधे अप्रयासीं । तरी कां कष्टिजे सायासीं ।

विश्र्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ६१ ॥

आम्हां साक्षी ऐसें घडलें । म्हणोनि विनवितसें बळें ।

श्रीगुरुचरण असें भलें । अनुभवा हो सकळिक ॥ ६२ ॥

तृप्ति झालियावरी ढेंकर । जेवीं देती जेवणार ।

गुरुमहिमेचा उद्गार । बोलतसें अनुभवोनि ॥ ६३ ॥

मी सामान्य म्हणोनि । उदास कराल माझें वचनीं ।

मक्षिकेच्या मुखांतुनी । मधु केवीं ग्राह्य होय ॥ ६४ ॥

जैसें शिंपल्यांत मुक्ताफळ । अथवा कर्पूर कर्दळी केवळ ।


विचारीं पां अश्र्वत्थमूळ । कवणापासाव उत्पत्ति ॥ ६५ ॥

ग्रंथ कराल उदास । वांकुडा कृष्ण दिसे ऊंस ।

अमृत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥ ६६ ॥

तैसें माझे बोलणे । ज्यांसी चाड गुरुस्मरणें ।

स्वीकारणार शहाणे । अनुभविती एकचित्तें ॥ ६७ ॥

ब्रह्मरसाची गोडी । अनुभवितां फळे रोकडी ।

या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥ ६८ ॥

गुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय महाज्ञानु ।

श्रोत्र करोनि सावधानु । एकचित्तें परियेसा ॥ ६९ ॥

श्रीगुरु नृसिंहसरस्वती । होते गाणगापुरीं ख्याति ।

महिमा त्यांची अत्युन्नती । सांगेन ऐका एकचित्तें ॥ ७० ॥

तया ग्रामीं होते गुरु । म्हणोनि महिमा असे थोरु ।

जाणे लोक चहूं राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥ ७१ ॥

तेथें जावोनि आराधिती । त्वरित होय फलप्राप्ति ।

पुत्र दारा धन संपत्ति । जें जें इच्छिलें होय जनां ॥ ७२ ॥

लाधोनियां संतान । नांव ठेविती नामकरण ।

संतोषरुपें येऊन । पावती चारी पुरुषार्थ ॥ ७३ ॥

ऐसें असतां वर्तमानीं । भक्त एक ‘ नामकरणी ‘ ।

कष्टतसे अति गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥ ७४ ॥

असे मनीं व्याकुळित । चिंतें वेष्टिला असे बहुत ।

गुरुदर्शना जाऊं म्हणत । निर्वाणमानसें निघाला ॥ ७५ ॥

अति निर्वाण अंत:करणीं । लय लावोनि गुरुचरणीं ।

जातो शिष्यशिरोमणी । क्षुधातृषा विसरोनियां ॥ ७६ ॥

निर्धार करोनि मानसीं । म्हणे पाहीन श्रीगुरुसी ।

अथवा सांडीन देहासी । जडरुपें काय कीजे ॥ ७७ ॥

ज्याचें नामस्मरण करितां । दैन्यहरु होय त्वरिता ।

आपण असे नामांकिता । किंकारण म्हणतसे ॥ ७८ ॥

दैव असे आपुलें उणें । तरी कां भजावे श्रीगुरुचरण ।

परिस लागतांचि क्षण । लोह सुवर्ण होतसे ॥ ७९ ॥

तैसे तुझें नाम परिस । माझे हृदयीं सदा वास ।

मातें कष्ट सायास । होतां लाज कवणासी ॥ ८० ॥

याचि बोलाचा हेवा । मनीं धरोनि पावावा ।

गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळुवा सर्वभूतीं ॥ ८१ ॥

अतिव्याकुळ अंतःकरणीं । कष्टला भक्त नामकरणी ।

निंदास्तुति आपुले वाणीं । करिता होय परियेसा ॥ ८२ ॥ (

राग स्वेच्छा ओंवीबद्ध म्हणावे )

वंदूं विघ्नरा, पार्वतीकुमरा । नमूं ते सुंदरा, शारदेसी ॥ ८३ ॥

गुरुचि त्रिमूर्ति, म्हणति वेदश्रुति । सांगती दृष्टांतीं, कलियुगांत ॥ ८४ ॥


कलियुगांत ख्याति, नृसिंहसरस्वती । भक्तांसी सारथी, कृपासिंधु ॥ ८५ ॥


कृपासिंधु भक्ता, वेद वाखाणिता । त्रैमूर्ति गुरुनाथा, म्हणोनियां ॥ ८६ ॥

त्रयमूर्तीचे गुण, तूं एक निधान । भक्तांसी रक्षण, दयानिधि ॥ ८७ ॥

दयानिधि यती, विनवितों श्रीपती । नेणे भावभक्ति, अंतःकरणीं ॥ ८८ ॥

अंतःकरण स्थिरु, नव्हे बा श्रीगुरु । तूं कृपासागरु, पाव वेगीं ॥ ८९ ॥

पाव वेगीं आतां, नरहरी अनंता । बाळालागीं माता, केवी टाकी ॥ ९० ॥

तूं माता तूं पिता, तूंचि सखा भ्राता । तूं कुळदेवता पारंपरीं ॥ ९१ ॥

वंशपारंपरीं, धरुनि निर्धारीं । भजतो मी नरहरी-सरस्वतीसी ॥ ९२ ॥ ॥

सरस्वती नरहरी, दैन्य माझे द्वारी । म्हणुनि मी निरंतरीं । कष्टतसें ॥ ९३ ॥

सदा कष्ट चित्ता, कां हो देशी आतां । कृपासिंधु भक्ता, केवीं होसी ॥ ९४ ॥

कृपासिंधु भक्ता, कृपाळू अनंता । त्रैमूर्ति समर्था, दयानिधि ॥ ९५ ॥

त्रैमूर्ति तूं होसी, पाळिसी विश्र्वासी । समस्त देवांसी, तूंचि दाता ॥ ९६ ॥

समस्तां देवांसी, तूंचि दाता होसी । मागों मी कवणासी, तुजवांचूनि ॥ ९७ ॥

तुजवांचूनि आतां, असे कवण दाता । विश्र्वासी पोषिता, सर्वज्ञ तूं ॥ ९८ ॥

सर्वज्ञ म्हणोनि, वानिती पुराणीं । माझे अंतःकरणी, न ये साक्षी ॥ ९९ ॥

सर्वज्ञाची खूण, असे हें लक्षण । समस्तांतें जाणे, कवण कैसा ॥ १०० ॥

कवण कैशापरी, असती भूमीवरी । जाणिजेचि तरी, सर्वज्ञ तो ॥ १०१ ॥

बाळक तान्हयें, नेणे बापमाय । कृपा केवीं होय, मातापित्या ॥ १०२ ॥

दिलियावांचोनि, नेदवे म्हणोनि । असेल तुझे मनीं, सांग मज ॥ १०३ ॥

समस्त महीतळी, तुम्हां दिल्हें बळीं । त्याते हो पाताळीं, बैसविलें ॥ १०४ ॥

सुवर्णाची लंका, तुवां दिल्ही एका । तेणे पूर्वी लंका, कवणा दिल्ही ॥ १०५ ॥

अढळ त्या ध्रुवासी, दिल्हें हृषीकेशी । त्याणे हो तुम्हांसी, काय दिल्हें ॥ १०६ ॥

निःक्षेत्री करुनी, विप्रांते मेदिनी । देतां तुम्हां कोणीं, काय दिल्हें ॥ १०७ ॥

सृष्टीचा पोषक, तूंचि देव एक । तूंते मी मशक, काय देऊं ॥ १०८ ॥

नाही तुम्ही जरी, श्रीमंत नरहरी । महालक्ष्मी घरीं, नांदतसे ॥ १०९ ॥

याहूनि आम्हांसी, तूं काय मागसी । सांग हृषीकेशी, काय देऊं ॥ ११० ॥

मातेचे वोसंगी, बैसोनियां बाळ । पसरी मुखकमळ, स्तनकांक्षेसी ॥ १११ ॥

बाळापाशीं माता, काय मागे ताता । ऐकें श्रीगुरुनाथा, काय देऊं ॥ ११२ ॥

घेऊनियां देतां, नाम नाही दाता । दयानिधि म्हणतां, बोल दिसे ॥ ११३ ॥

देऊं तूं न शकसी, म्हणों मी मानसीं । चौदाही भुवनांसी, तूंचि दाता ॥ ११४ ॥

अथवा तुझे मनीं, वसें आणिक कांही । सेवा केली नाही, म्हणोनियां ॥ ११५ ॥

सेवा घेवोनियां, देताहे सामान्या । नांव नाही जाणा, दातृत्वासी ॥ ११६ ॥

तळी बावी विहिरी, असती भूमीवरी । मेघ तो अंबरी वर्षतसे ॥ ११७ ॥

मेघाची ही सेवा, न करितां स्वभावा । उदक पूर्ण सर्वां, केवीं करी ॥ ११८ ॥

सेवा अपेक्षितां, बोल असे दाता । दयानिधि म्हणतां, केवीं साजे ॥ ११९ ॥

नेणें सेवा कैसी, स्थिर नव्हे मानसीं । माझे वंशोवंशी, तुझे दास ॥ १२० ॥

माझ्या पूर्वजवंशी, सेविलें असेल तुम्हांसी । संग्रह बहुवसी, तुझे चरणी ॥ १२१ ॥

बापाचे सेवेसी, पाळिती पुत्रासी । तेवीं त्वां आम्हासी, प्रतिपाळावें ॥ १२२ ॥

माझें पूर्वजधन, द्यावें तुहीं ऋण । कां बा न ये करुणा, कृपासिंधु ॥ १२३ ॥

आमुचें आम्हां देतां, कां बा नये चित्ता । सांगेन मी संता, घेईन आतां ॥ १२४ ॥

आतां मज जरी, न देसी नरहरी । जिंतोनी व्यवहारीं, घेईन जाणा ॥ १२५ ॥

दिसतसे आतां, कठिणता गुरुनाथा । दास मी अंकिता, सनातन ॥ १२६ ॥

आपुले समान, असेल कवण । तयासवें मन, कठिण कीजे ॥ १२७ ॥

कठिण कीजे हरी, तुवां दैत्यांवरी । प्रल्हादा कैवारी, सेवकांसी ॥ १२८ ॥

सेवकां-बाळांसी, करुं नये ऐसी । कठिणता परियेसीं, बरवें न दिसे ॥ १२९ ॥

माझिया अपराधीं, धरोनियां बुद्धि । अंतःकरण क्रोधीं, पहासी जरी ॥ १३० ॥

बाळक मातेसी, बोले निष्ठुरेंसीं । अज्ञानें मायेसी, मारी जरी ॥ १३१ ॥

माता त्या कुमरासी, कोप न धरी जैसी । आलिंगोनि हर्षी, संबोखी पां ॥ १३२ ॥

कवण्या अपराधेंसीं, न बोलसी आम्हांसी । अहो हृषीकेशी, सांग मज ॥ १३३ ॥

माता हो कोपेंसी, बोले बाळकासी । जाऊनि पितयासी, सांगे बाळ ॥ १३४ ॥

पिता कोपे जरी, एके अवसरीं । माता कृपा करी, संबोखूनि ॥ १३५ ॥

तूं माता तूं पिता, कोपसी गुरुनाथा । सांगो कवणा आतां, क्षमा करीं ॥ १३६ ॥

तूंचि स्वामी ऐसा, जगीं झाला ठसा । दास तो भलतैसा, प्रतिपाळावा ॥ १३७ ॥

अनाथरक्षक, म्हणती तुज लोक । मी तुझा बाळक, प्रतिपाळावें ॥ १३८ ॥

कृपाळू म्हणोनि, वानिती पुराणीं । माझे बोल कानीं, न घालिसीच ॥ १३९ ॥

नायकसी गुरुराणा, माझे करुणावचना । काय दुश्र्चित्तपणा, तुम्हां असे ॥ १४० ॥

माझें करुणावचन, नायके तुझे कान । ऐकोनि पाषाण, विघरतसे ॥ १४१ ॥

‘ करुणाकर ‘ ऐसे, वानिती तुजसी । अजुनि तरी कैसी, कृपा न ये ॥ १४२ ॥

ऐसें नामांकित, विनवितां त्वरित । कृपाळू गुरुनाथ, आले वेगीं ॥ १४३ ॥

वत्सालागीं धेनु, जैसी ठाकी भुवनु । तैसे श्रीगुरु आपणु, आले जवळी ॥ १४४ ॥

येतांचि गुरु मुनि, वंदी ‘ नामकरणी ‘ । मस्तक ठेवोनि, चरणयुग्मीं ॥ १४५ ॥

केश तो मोकळी, झाडी चरणधूळी । आनंदाच्या जळी, अंघ्री क्षाळी ॥ १४६ ॥

हृदयमंदिरांत, बैसवोनि व्यक्त । पूजा उपचारित, षोडशविधि ॥ १४७ ॥

आनंदभरित, झाला ‘ नामांकित ‘ । हृदयीं श्रीगुरुनाथ, स्थिर झाला ॥ १४८ ॥

भक्तांच्या हृदयांत, राहे श्रीगुरुनाथ । संतोष बहुत, सरस्वतीसी ॥ १४९ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने

सिद्धनामधारकसंवादे मंगळाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय