GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 35 | गुरुचरित्र अध्याय पैंतीस

गुरुचरित्र अध्याय 35 में सोमवार व्रत के महात्म्य का वर्णन है। यह अध्याय हमें सिखाता है कि सोमवार व्रत करने से भक्त को सभी तरह के कष्टों से मुक्ति मिलती है और उसे जीवन में सभी सुख-समृद्धि प्राप्त होती है। इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक ब्राह्मण को सोमवार व्रत करने से सभी तरह के कष्टों से मुक्ति मिली और उसे जीवन में सभी सुख-समृद्धि प्राप्त हुई। ब्राह्मण बहुत गरीब था और वह अपने जीवन में बहुत दुखी था। उसने एक गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने ब्राह्मण को सोमवार व्रत करने की सलाह दी। ब्राह्मण ने गुरु की आज्ञा का पालन किया और सोमवार व्रत किया। सोमवार व्रत करने के बाद, ब्राह्मण के सभी कष्ट दूर हो गए और उसे जीवन में सभी सुख-समृद्धि प्राप्त हुई।

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक सिद्धासी । विनवीतसे परियेसीं ।

रुद्राध्याय विस्तारेसीं । दंपतीतें सांगितला ॥ १ ॥

पुढें काय वर्तलें । विस्तारुनि सांगा वहिले ।

मन माझें वेधलें । गुरुचरित्र ऐकावया ॥ २ ॥


सिद्ध म्हणे ऐक ताता । अपूर्व असे पुढें कथा ।

तेचि जाणा पतिव्रता । श्रीगुरुतें विनवीत ॥ ३ ॥


कर जोडोनि श्रीगुरुसी । विनवीतसे भकतीसीं ।

आम्हां गति पुढें कैसी । कवणेपरि असावें ॥ ४ ॥


याकारणें आपणासी । एखादा मंत्र उपदेशी ।

जेणें राहे जीवासी । चरणस्मरण सनातन ॥ ५ ॥


श्रीगुरु म्हणती तियेसी । स्त्रियांतें काय उपदेशी ।

पतिभक्ति करावी हर्षी । उपदेश स्त्रियांतें देऊ नये ॥ ६ ॥


देता उपदेश स्त्रियांसी । विघ्न असे मंत्रासी ।

पूर्वी शुक्राचार्यासी । घडले असे परियेसा ॥ ७ ॥


ऐसें ऐकोनि श्रीगुरुवचन । विनवीतसे कर जोडून ।

स्त्रिया केवीं मंत्रहीन । शुक्राचार्या केवीं झालें ॥ ८ ॥


विस्तारोनि आम्हांसी । सांगा स्वामी कृपेसीं ।

म्हणोनि लागली चरणासी । करुणावचनेंकरुनियां ॥ ९ ॥


श्रीगुरु सांगती तियेसी । पूर्वकथा परियेसी ।

युद्ध देवदैत्यांसी । सदा होतसे अवधारीं ॥ १० ॥


दैत्यसैन्य पडे रणीं । शुक्र करी संजीवनी ।

समस्त सैन्य उठवूनि । पुनरपि पाठवी युद्धासी ॥ ११ ॥


इंद्र वज्रेंकरुनि मारी । शुक्र अमृत-जप करी ।

सवेंचि येती निशाचरी । देवसैन्य मारावया ॥ १२ ॥


ऐसें होतां एके दिवसीं । इंद्र गेला कैलासासी ।

सांगे स्थिति शिवासी । शुक्राचार्याची मंत्रकरणी ॥ १३ ॥


कोपोनियां ईश्र्वर । नंदीस सांगे उत्तर ।

जावोनियां वेगवक्त्र । शुक्राचार्या धरुनि आणिं ॥ १४ ॥


स्वामीवचन ऐकोनि । नंदी गेला ठाकोनि ।

शुक्र होता तपध्यानीं । मुखें धरिला नंदीने देखा ॥ १५ ॥


घेऊनि गेला शिवापाशी । आकांत दैत्यदलासी ।

ईश्र्वरें ग्रासिलें तयासी । अगस्त्य-सिंधूपरी देखा ॥ १६ ॥

ऐसा किती दिवसवरी । होता शुक्र शिवाचे उदरीं ।

निघूनि गेला मूत्रद्वारीं । विसर पडे शंकरासी ॥ १७ ॥

पूर्वी होतें शुक्र नांव । ईश्र्वर-उदरीं जाहला उद्भव ।

नाम पावला ‘ भार्गव ‘ । पुनरपि अमृतमंत्र जपे ॥ १८

इंद्र मनीं विचारी । पुरोहितासी पाचारी ।

कैसा मंत्र शुक्र करी । अमृतसंजीवनी दैत्यांसी ॥ १९ ॥


यासी करावया विघ्न एक । तूं पुरोहित विवेक ।

बुद्धि-विचार अधिक । बृहस्पति गुरुराया ॥ २० ॥


पाहे पां दैत्यदैव कैसें । शुक्रासारिखा गुरु विशेषें ।

देतो जीवासी भरंवसे । दैत्य येती युद्धासी ॥ २१ ॥


तैसा नव्हेस तूं आम्हांसी । आमुतें कां गा उपेक्षिसी ।

देवगुरु तूं म्हणविसी । बुद्धि विचारीं शीघ्र आतां ॥ २२॥


तूं पूज्य समस्त देवांसी । जरी तूं आम्हां कृपा करिसी ।

शुक्राचार्य काय विशेषीं । तुजसमान नव्हे जांण ॥ २३ ॥


ऐसें नानापरी देख । इंद्र अमरनायक ।

पूजा केली उपचारिक । बृहस्पति संतोषला ॥ २४ ॥


गुरु म्हणे इंद्रासी । यासी उपाव करावा ऐसी ।

षट्कर्ण करितां मंत्रासी । सामर्थ्य राहील शुक्राचें ॥ २५ ॥


एखादा पाठवावा शुक्रापाशीं । विद्यार्थी होऊन कपटवेषीं ।

मंत्र शिकेल परियेसीं । विघ्न होईल म्हणोनि ॥ २६ ॥


आपुला पुत्र कच असे । त्यातें पाठवूं विद्याभ्यासें ।

मंत्र शिकेल कैसा असे । ऐसा निर्धार केला देखा ॥ २७ ॥


कचातें बृहस्पति । सांगतसे बुद्धि प्रीतीं ।

तुवां जावें शुक्राप्रती । विद्यार्थिरुप धरोनियां ॥ २८ ॥


आमुची निंदा तेथें करीं । मनोभावें सेवा करीं ।

संजीवनी कवणेपरी । मंत्र शिकें पुत्रराया ॥ २९ ॥


निरोप घेऊनि पितयाचा । आणि इंद्रादि समस्त देवांचा ।

शुक्राप्रती गेला कचा । विद्यार्थिरुप धरोनि ॥ ३० ॥


नमन करुनि सांष्टांगीं । उभा राहिला करुणांगीं ।

शुक्र पुसतसे वेगीं । कवण कोठोनि आलासी ॥ ३१ ॥


बोले आपण द्विजकुमर । ऐकिली तुझी कीर्ति थोर ।

विद्याभ्यासीन मनोहर । म्हणोन आलों सेवेसी ॥ ३२ ॥


सेवक होईन तुमचे चरणीं । धरुनि आलों अंतःकरणीं ।

तूं भक्तवत्सलशिरोमणि । अनाथाचा प्रतिपालक ॥ ३३ ॥


ऐसें करुणावचनें देखा । विनवीतसे कच निका ।

जवळी उभी शुक्रकन्यका । करुणें पितयासी विनवीतसे ॥ ३४ ॥


शुक्रासी म्हणे देवयानी । ब्राह्मण भला दिसे नयनीं ।

यातें तुम्हीं शिष्य करुनि । विद्याभ्यास सांगावा ॥। ३५ ॥


कच सुंदर सुलक्षण । जैसा दिसे मदन कामन ।

देवयानी करी चिंतन । ऐसा पति व्हावा मज ॥ ३६ ॥


ऐसी वासना धरुनी मनीं । पितयातें विनवी नमुनी ।

शिष्य केला कच सगुणी । शुक्राचार्य कृपा करी ॥ ३७ ॥


ऐसा विद्याभ्यास करितां । दैत्यकुळ दुःखिता ।

देवगण आले आतां । कपटवेष म्हणती त्यासी ॥ ३८ ॥


शिकूनियां विद्येसी । शिकवील जाऊनि देवांसी ।

कुडें होईल आम्हांसी । म्हणोनि चिंतिती मनामध्यें ॥ ३९ ॥


काळ क्रमितां एके दिवसीं । कचातें पाठविलें समिधांसी ।

दैत्य जाती साह्यासी । समिधेनिमित्त रानांत ॥ ४० ॥


रानीं जाऊनि कचासी । दैत्यें मारिलें द्वेषीं ।

समिधा घेवोनियां घरासी । दैत्य आपण येते झाले ॥ ४१ ॥


शुक्राचार्याची कन्या । नाम तिचें देवयानी म्हणोनियां ।

पितयासी विनवी नमूनियां । कच न दिसे कोठें आणा ॥ ४२ ॥


कच आलियावांचून । भोजन ज करी आपण ।

ऐसें करीतसे निर्वाण । शुक्राचार्य चिंतीतसे ॥ ४३ ॥


ज्ञानें पाहे मानसीं । मृत्यु झाला असे त्यासी ।

मंत्र जपूनि संजीवनीसी । त्वरित घरासी आणिला ॥ ४४ ॥


आणिक होतां बहुत दिवस । दैत्य करिती अतिद्वेष ।

गेला होता वनास । पुनरपि वधिती तयासी ॥ ४५ ॥


मागुती वाचेल म्हणोनि । चूर्ण करिती छेदोनि ।

दाही दिशा टाकोनि । आले घरा पुनरपि ॥ ४६ ॥


दिवस गेला अस्तमानीं । पुसतसे देवयानी ।

कच न दिसे म्हणोनि । पितयातें विनवीतसे ॥ ४७ ॥


कच माझा प्राणसखा । नाणिसी जरी घेईन विखा ।

दाखवी मज याचे मुखा । म्हणोनि प्रलाप करीतसे ॥ ४८ ॥


कन्येवरी ममत्व बहुत । म्हणोनि शुक्र ज्ञानें पहात ।

छिन्नविच्छिन्न केले म्हणत । मंत्र जपला संजीवनी ॥ ४९ ॥


ऐसें मंत्राचें सामर्थ्य । कच आला घरा त्वरित ।

देवयानी संतोष करीत । पिता आलिंगी कन्येसी ॥ ५० ॥


दैत्य-शिष्य विचार करिती । कांहीं केलिया न मरे म्हणती ।

गुरुकन्येसी असे प्रीति । म्हणूनि गुरु वांचवितो ॥ ५१ ॥


आतां उपाय करुं यासी । येईल उदईक एकादशी ।

मारुनि मिळवूं पानकेसी । गुरुमुखीं पाजवूं ॥ ५२ ॥


ऐसी निगुती करुनि । आली एकादशी दिनीं ।

कचातें बाहेर नेवोनि । मारिते जहाले दैत्य-शिष्य ॥ ५३ ॥


पानक करिती गुरुसी । त्यांत मिळविती समरसीं ।

स्निग्धा मिळवूनि बहुवसी । शुक्रगुरुसी देते झाले ॥ ५४ ॥


मागुती पुसे देवयानी । पितयातें विनवूनि ।

सखा आणीं म्हणोनि । अति रुदना करीतसे ॥ ५५ ॥


शुक्र पहातसे ज्ञानी । न दिसे कच त्रिभुवनीं ।

खेद करीतसे देवयानी । कन्यामोह असे बहुत ॥ ५६ ॥


विचार करितां सर्वां ठायीं । दिसों लागला आपुले देही ।

संदेह पडला शुक्रा पाहीं । कैसें करुं म्हणतसे ॥ ५७ ॥


कन्येसी म्हणे शुक्र देखा । कच नये आतां ऐका ।

माझे उदरीं असे निका । केवीं काढूं तयासी ॥ ५८ ॥

यासी काढितां आपणासी । मृत्यु होईल परियेसी ।

काय अभिलाष असे त्यासी । म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥ ५९ ॥


पितयासी विनवी देवयानी । अभिलाष होता माझे मनीं ।

भार्या होईन त्यासी म्हणोनि । दोघें असतों तुजपाशीं ॥ ६० ॥


येणें व्हावें माझा पति । होतां संकल्प माझे चित्तीं ।

जरी न आणिसी माझा पति । प्राण त्यजीन म्हणतसे ॥ ६१ ॥


संदेह पडला शुक्रासी । बोधिता झाला कन्येसी ।

त्यासी आणितां आपणासी । मृत्यु होईल अवधारीं ॥ ६२ ॥


कन्या म्हणे पितयासी । समस्तां तूं वांचविसी ।

आपुला प्राण जाईल म्हणसी । अति आश्र्चर्य म्हणतसे ॥ ६३ ॥


शुक्र म्हणे देवयानी । मंत्र असे संजीवनी ।

मजवांचूनि नेणें कोणी । मातें कोण उठविल ॥ ६४ ॥


मंत्र सांगो नये कवणा । षट्कर्ण करितां जाईल गुणा ।

कचाकरितां आपुला प्राण । जाईल म्हणे शुक्र देखा ॥ ६५ ॥


न ऐके कन्या देवयानी । पित्याचे चरण धरुनि ।

विनवीतसे कर जोडोनि । मंत्र आपणासी शिकवावा ॥ ६६ ॥


कचासी तूं मंत्र करी । मृत्यु येईल तुज जरी ।

मंत्र करुनि तुम्हां जागृत करीं । म्हणोनि चरणीं लागली ॥ ६७


शुक्र म्हणे कन्येसी । मंत्र सांगूं नये स्त्रियांसी ।

दोष असे परियेसीं । वेदशास्त्रीं असंख्यांत ॥ ६८ ॥


स्त्रियांसी मंत्र पतिभक्ति । जपूं नये मंत्रयुक्ति ।

सांगतां दोष आम्हां घडती । मंत्रसत्व जाईल ॥ ६९ ॥


पित्यासी म्हणे देवयानी । सुखें असा मंत्र जपोनि ।

त्यजीन आपुला प्राण म्हणोनि । आली मूर्छना तयेवेळीं ॥ ७० ॥


शुक्राची कन्येवरी प्रीति । उठवोनि तिसी आलिंगिती ।

मंत्र तिसी सांगती । संजीवनी अवधारा ॥ ७१ ॥


कच आपुल्या पोटीं होता । तोही होय ऐकता ।

मंत्र जहाला षट्कर्णता । मग जपिला कचानिमित्यें ॥ ७२ ॥


शुक्राचे पोटांतुनी । कच निघाला फुटोनि ।

मंत्र जपोनि देवयानी । पितयातें उठविलें ॥ ७३ ॥


तीन वेळां मंत्र जपतां । कचें पाठ केला तत्त्वता ।

संतोष करी मनीं बहुता । कार्य साधलें म्हणोनि ॥ ७४ ॥


शुक्राचार्यासी नमूनि । कच विनवी कर जोडूनि ।

दैत्यद्वेषें मरतों म्हणोनि । निरोप द्यावा आपणासी ॥ ७५ ॥


स्वामीधर्में विद्या शिकलों । जें जें मनींचे लाधलों ।

तुझे कृपें पूर्ण जहालों । म्हणोनि चरणीं लागला ॥ ७६ ॥


शुक्राचार्ये हर्षोनि । निरोप दिधला संतोषोनि ।

पालव धरी देवयानी । आपुला पति होई म्हणे ॥ ७७ ॥


तूंतें मारिलें दैत्यें सकळी । प्राण आणविले आपण ।

विद्या शिकलासि पित्याजवळी । अवश्य वरावें म्हणतसे ॥ ७८ ॥


कच म्हणे ऐक बाळे । गुरुकन्या भगिनी बोले ।

तुवां आमुतें वांचविलें । माता होसी निर्धारीं ॥ ७९ ॥


वरितां दोष आपणासी । दूषण करिती समस्त ऋषि ।

बहीण तूं आमुची होसी । म्हणोनि विनवी तयेवेळीं ॥ ८० ॥


देवयानी कोपोनियां । शाप दिधला तत्क्षणीं तया ।

वृथा होय तुझी विद्या । समस्त विसरसी तात्काळी ॥ ८१ ॥


माझे अंतःकरणींची आशा । तुंवा केली दुराशा ।

विद्या नये तुज लवलेश । म्हणूनि शाप देतसे ॥ ८२ ॥


कच म्हणे तियेसी । वायां शापिलें आम्हांसी ।

पुरुष होईल तुज ऐसी । ब्रह्मकुळाव्यतिरिक्त ॥ ८३ ॥


तुझा पिता ब्रह्मज्ञानी । जाणे अमृतसंजीवनी ।

तुज शिकविल्या-गुणीं । पुढें मंत्र न चाले जाण ॥ ८४ ॥


ऐसा शाप देऊनि । कच गेला निघोनि ।

संतोष झाला इंद्रभुवनीं । दैत्यजीवनी नव्हेचि ॥ ८५ ॥


शुक्राचा संजीवनी मंत्र । कामा नये जाहला अपात्र ।

स्त्रियांसी न सांगावा मंत्र । म्हणोनि श्रीगुरु निरुपती ॥ ८६ ॥


स्त्रियांसी कारण पतिसेवा । याचि कारणें मंत्र न द्यावा ।

व्रतोपास करावा । गुरु-पुरुष निरोपें ॥ ८७ ॥


सावित्री विनवी श्रीगुरुसी । व्रतें आचरलीं बहुवसी ।

तुझे वाक्यें आम्हांसी । एखादें व्रत निरोपावें ॥ ८८ ॥


तूं तारक विश्र्वासी । तुजवांचूनि नेणों आणिकासी ।

तूंचि तारक आम्हांसी । व्रत तुझी चरणसेवा ॥ ८९ ॥


भक्ति राहे तुझिया चरणीं । ऐसा निरोप द्यावा मुनि ।

म्हणूनि लागली चरणीं । कृपा करीं म्हणोनियां ॥ ९० ॥


श्रीगुरु म्हणती तियेसी । सांगेन व्रत तुज ऐसी ।

स्थिर होय अहेवपणासी । राज्य पावे तुझा पति ॥ ९१ ॥


दंपती विनवी स्वामियासी । वाक्य कारण आम्हांसी ।

जैसा कांहीं निरोप देसी । तेणेंपरी रहाटों स्वामिया ॥ ९२ ॥


जो गुरुचें वाक्य न करी । तोचि पडे रौरवघोरीं ।

तुझे वाक्य आम्हां तारी । म्हणोनि चरणीं लागती ॥ ९३ ॥


भक्तवत्सल श्रीगुरुनाथ । सांगता जहाला अतिप्रीत ।

विश्र्व तारावया समर्थ । व्रत तिसी सांगतसे ॥ ९४ ॥


सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरु सांगती अतिकवतुका ।

ऐकताति दंपतीं निका । अतिप्रीतीकरुनियां ॥ ९५ ॥


श्रीगुरु म्हणती तयांसी । सांगेन व्रत इतिहासीं ।

ऋषि पुसती सूतासी । व्रत बरवें निरोपावें ॥ ९६ ॥


सूत म्हणे ऋषेश्र्वरां । सांगतो व्रत मनोहरा ।

स्त्री अथवा पुरुषवरा । व्रत असे अवधारा ॥ ९७ ॥


नित्यानंद असे शांत । निर्विकल्प निरामय वस्त ।

ऐसा ईश्र्वर अर्चा त्वरित । सकळाभीष्ट पाविजे ॥ ९८ ॥


विरक्त अथवा मदनरत । विषयातुर आसक्त ।

जे पूजिती पूर्ण भक्त । त्यांसी ईश्र्वर प्रसन्न ॥ ९९ ॥


संसार मायासागरांत । भुंजताति जन समस्त ।

एखादे समयी श्रीगुरुभक्त । शिवव्रत आचरिती ॥ १०० ॥


त्याणें पावतील पैलपार । ऐसें बोलती वेदशास्त्र ।

स्वर्गापवर्गा अधिकार । त्यासी होती परियेसा ॥ १०१ ॥


विशेष असे व्रत एक । सोमवार महासुख ।

ईश्र्वरार्चन करावें ऐक । सकाळभीष्ट पाविजे ॥ १०२ ॥


नक्तभोजन उपवास । जितेंद्रिय करावें विशेष ।

वैदिक-लौकिक मार्गीं सुरस । विधिपूर्वक पूजावें ॥ १०३ ॥


गृहस्थादि ब्रह्मचारीं । सुवासिनीं कन्याकुमारीं ।

भ्रताराविण विधवा जरी । व्रत करावें अवधारा ॥ १०४ ॥


याचें पूर्वील आख्यान । सांगता असे अतिगहन ।

एकचित्तें परिसा जन । ऋषिस्तोम सकळिक ॥ १०५ ॥


स्कंदपुराणींची कथा । सर्व साध्य ऐकतां ।

पूर्वकाळीं आर्यावर्ता । राजा एक अवधारा ॥ १०६ ॥


‘ चित्रवर्मा ‘ नाम त्यासी । धर्मात्मा परियेंसी ।

धर्ममार्ग आचरे हर्षीं । अधर्मियाते शिक्षा करी ॥ १०७ ॥

अखिल पुण्य त्याणें केले । सकळ संपदे वाढविलें ।

समस्त वैरी जिंकिले । पराक्रमी महा शौरी ॥ १०८ ॥


सहपत्या धर्म करिती । पुत्रकाम्यें शिवा पूजिती ।

ऐसे किती काळ क्रमिती । कन्या जाहली तयांसी ॥ १०९ ॥


अतिसुंदर सुलक्षणी । जैसी पार्वती स्वरुपिणी ।

तेज फांके सूर्यकिरणी । अतिलावण्यस्वरुपीं ॥ ११० ॥


वर्तावया जातकासी । बोलाविले सकळ ज्योतिषी ।

द्विज मिळोनि अपारेसीं । जातक वर्तविती अवधारा ॥ १११ ॥


म्हणती कन्या सुलक्षण । नाम ‘ सीमंतिनी ‘ जाण ।

उमेसारखें मांगल्यपण । दमयंती-रुप होय ॥ ११२ ॥


भागीरथीसम कीर्तीसी । लक्ष्मी गुणें परियेसीं ।


सूर्यासारिखी होईल कांति । चंद्रासारिखी मनःशांति ।

दहा सहस्त्र वर्षें ख्याती । पतिसहित राज्य करील ॥ ११४ ॥


ऐसें जातक वर्तविलें तिसी । राव करी अतिहर्ष ।

अखिल दानें ब्राह्मणांस । देता जाहला आनंदे ॥ ११५ ॥


असतां राजा सभेसी । द्विज एक परियेंसी ।

भय न धरितां वाक्यासी । बोलता जाहला अवधारा ॥ ११६ ॥


ऐक राया माझें वचन । कन्यालक्षण सांगेन ।

चवदावें वर्षी विधवापण । होय तुझ्या कन्येसी ॥ ११७ ॥


ऐसें वचन ऐकोनि । राजा पडिला मूर्च्छनीं ।

चिंता करी बहु मनीं । ब्राह्मणवचन परिसतां ॥ ११८ ॥


ऐसें सांगोनि ब्राह्मण । निघोनि गेला तत्क्षण ।

राजयाचें खेचिं अंतःकरण । म्हणे ईश्र्वराधीन सर्व ॥ ११९ ॥


ऐसें बाळपण क्रमितां । सीमंतिनी वर्षे साता ।

चिंतीत होती मातापिता । वर्‍हाड केवीं करुं म्हणती ॥ १२० ॥


चवदावें वर्षीं विधवत्व येणें । म्हणोनि सांगितलें ब्राह्मणें ।

तेणें व्याकुळ अंतःकरण । राजा-राजपत्नीचें ॥ १२१ ॥


कन्या खेळें राजांगणा । सवें असती सखी जन ।

बोलतां ऐकिलें वचना । चौदा वर्षी विधवत्व ॥ १२२ ॥


ऐसें ऐकोनियां वचन । कन्या करितसे चिंतन ।

वर्ततां आली एक दिन । तयां घरीं ब्राह्मणस्त्री ॥ १२३ ॥


याज्ञवल्क्याची पत्नी । नाम तिचें असे मैत्रायणी ।

घरांत आली पवित्रिणी । कन्या लागे चरणासी ॥ १२४ ॥


साष्टांगीं नमोनि । करसंपुट जोडोनि ।

विनवीतसे करुणावचनीं । मातें प्रतिपाळीं म्हणतसे ॥ १२५ ॥


सौभाग्य स्थिर अहेवपण । उपाय सांगे दया करुन ।

चंचळ असे अतःकरण । म्हणूनि चरणा लागली ॥ १२६ ॥


ऐकोनि कन्येचें वचन । बोले विप्रस्त्री जाण ।

शरण रिघावें उमारमणा । अहेवपण स्थिर होय ॥ १२७ ॥


कन्या विनवी तियेसी । कैसे सांगे आम्हांसी ।

जननी तूंचि होसी । कैसे व्रत सांगे म्हणे ॥ १२८ ॥


विप्रस्त्री सांगे तियेसी । सोमवार व्रत परियेंसी ।

पूजा करावी शिवासी । उपवासोनि अवधारीं ॥ १२९ ॥


बरवें सुस्नात होवोनि । दिव्य वस्त्र परिधानूनि ।

स्थिर मन करोनि । पूजा करी गौरीहरा ॥ १३० ॥


अभिषेकें पापक्षय । पीठ पूजितां साम्राज्य ।

गंधाक्षता-पुष्पमाल्यें । सौभाग्यसौख्य अखिल पावे ॥ १३१ ॥


सुगंधी होय धूपदानें । कांति पाविजे दीपदानें ।

भोग नैवेद्यअर्पणाने । तांबूलदानें लक्ष्मी स्थिर ॥ १३२ ॥


चतुर्विध पुरुषार्थ । नमस्कार करितां त्वरित ।

अष्टैश्र्वर्ये नांदत । ईश्र्वरजप केलिया ॥ १३३ ॥


होमें सर्व कोश पूर्ण । समृद्धि स्तविता होय जाण ।

भोजन करवितां ब्राह्मण । सर्वदेव तृप्त होती ॥ १३४ ॥


ऐसें सोमवार व्रत । करी वो तूं कन्ये निश्र्चित ।

भय आलिया, दुरित । परिहरती महा क्लेश ॥ १३५ ॥


गौरिहरपूजा करितां । समस्त दुरितें जाती परता ।

ऐकोनि सीमंतिनी त्वरिता । अंगीकारिलें व्रतदेखा ॥ १३६ ॥


सोमवाराचिया व्रता । आचरे सीमंतिनी त्वरिता ।

पिता देखोनि चिंतित । विवाहा योग्य म्हणोनि ॥ १३७ ॥


राजा विचारी मानसीं । वर्‍हाड करावें कन्येसी ।

जैसे प्राप्तव्य असे तिसी । तैसे घडेल म्हणतसे ॥ १३८ ॥


विचारावया मंत्रियासी । पाठविता जाहला राष्ट्रासी ।

दमयंतीनळवंशी । इंद्रसेन-कुमारक ॥ १३९ ॥


चंद्रागंद वर बरवा । जैसे चंद्र तेज प्रभा ।

बोलाविती विवाहशोभा । कन्या दिधली संतोषें ॥ १४० ॥


राजे भूमांडलिक देखा । समस्त आले वर्‍हाडिका ।

विवाह केला विवेका । महोत्साह नानापरी ॥ १४१ ॥


नाना द्रव्यालंकार । वर्‍हाडिकां दे नृपवर ।

अखिल दानें देकार । विप्रांसी देता झाला देखा ॥ १४२ ॥


पाठवणी केली सकळिकां । जांवई ठेविला कवतुका ।

कन्यास्नेह अनेका । म्हणोनि राहवी राजपुत्रा ॥ १४३ ॥


राजपुत्र श्र्शुरालयीं । स्त्रिया प्रेमें अतिस्नेहीं ।

काळ क्रमितां एके समयीं । जलक्रीडे निघाला ॥ १४४ ॥

कालिंदी म्हणिजे नदीसी । राजपुत्र परियेसीं ।

सर्व दळ समसगमेसीं गेला नदीसी विनोदें ॥ १४५ ॥

राजपुत्र नदींत । सवें निघाले लोक बहुत ।

विनोदें असे पोहत । अतिहर्षें जलक्रीडा ॥ १४६ ॥

पोहतां राजककुमार देखा । बुडाला मध्यें-गंगोदका ।

आकांत झाला सकळिकां । काढा काढा म्हणताति ॥

१४७ ॥

सवें सैन्य लोक सकळ । होते नावेकरी प्रबळ ।

उदकीं पाहती तये वेळ । न दिसे कुमर बुडाला ॥ १४८

उभय तटाकीं सैन्य । धांवत गेले राजधाना ।

व्यवस्था सांगती पूर्ण । जांवई तुमचा बुडाला ॥ १४९ ॥


कालिंदीये डोहांत । सवें-गड्या राव होता पोहत ।

अदृश्य झाला त्वरित । न दिसे गंगेंत बुडाला ॥ १५० ॥


ऐकोनि राजा पडे धरणीं । मूर्च्छा येऊनि तत्क्षणीं ।

कन्या ऐकतांच श्रवणीं । त्यजूं पाहे प्राण आपुला ॥ १५१ ॥


राजा कन्येसी संबोखीत । आपण गेला धांवत ।

राजस्त्री असे शोक करीत । कन्यादुःख अतिबहु ॥ १५२ ॥


सीमंतिनी करी शोका । म्हणे देवा त्रिपुरांतका ।

शरण रिघाल्यें तुज ऐका । मरण कैसें आलें मज ॥ १५३ ॥


मृत्यु चवदा वर्षी जाणे । म्हणोनि धरिले तुझे चरण ।

वृथा झालें गौरीपूजन । तुजसहित सोमवारीं ॥ १५४ ॥


तुझें देणें अढळ सकळां । उपेक्षिलें जाश्र्वनीळा ।

अपकीर्ति तुज केवळा । शरणागता रक्षीं रक्षीं ॥ १५५ ॥


स्मरण करी श्रीगुरुसी । याज्ञवल्क्यपत्नीसी ।

सांगितले व्रत आम्हांसी । अहेवपण म्हणोनि ॥ १५६ ॥


तुझें वाक्य ऐकोनि । पूजा केली शिवभवानी ।

वृथा होतसे माझे मनीं । शीघ्र विनवी शिवासी ॥ १५७ ॥

ऐसें दुःखें प्रलापीत । सीमंतिनी जाय त्वरित ।

गंगाप्रवेश करीन म्हणत । निघाली वेगें गंगेसी ॥ १५८ ॥


पिता देखोनि नयनीं । धरावया गेला धांवोनि ।

कन्येतें आलिंगोनि । दुःख करी अत्यंत ॥ १५९ ॥


समस्त मंत्री पुरोहित । सकल सैन्य दुःख करीत ।

बोलाविती नावेकरीयांते । पहा म्हणती गंगेंत ॥ १६० ॥


गंगा समस्त शोधिती । न दिसे कवण गतीं ।

शोक करी सीमंती । राजा संबोखी तियेसी ॥ १६१ ॥


रजकुमाराचे सेवक । करुं लागले बहु दुःख ।

सांगो गेले पुत्र शोक । इंद्रसेनरायासी ॥ १६२ ॥


ऐकोनि इंद्रसेन । दुःख करी अतिगहन ।

भार्येसहित निघोन । आला तया मृत्युस्थळा ॥ १६३ ॥


दोघे राजे मिळोन । प्रलाप करिती रोदनीं ।

हा हा कुमारा म्हणोन । ऊर-शिर पिटिताति ॥ १६४ ॥


‘ हो पुत्र हो तात ‘ म्हणत । राजा असे लोळत ।

मंत्री राजकुळ समस्त । नगरलोक दुःख करिती ॥ १६५ ॥


कोठे गेलासी राजपुत्रा । म्हणोनि सीमंतिनी रडत ।

खिन्न होती समस्त । माता पिता श्र्वशुरादि ॥ १६६ ॥


सीमंतिनी म्हणे पितयासी । प्राण त्यजीन पतिसरसी ।

वांचूनियां संसारासी । काय उपयोग वैधव्यत्वें ॥ १६७ ॥


पुसती सकळ द्विजांसी । करावें सहगमन कैसी ।

विप्र सांगती रायासी । प्रेतावेगळें करुं नये ॥ १६८ ॥


प्रेत विचारावें नदींत । दहन करावें कन्येसहित ।

न दिसे बुडाला गंगेंत । केवीं कराल म्हणताति ॥ १६९ ॥


आतां इसी ऐसें करणें । प्रेत सांपडे तव राखणें ।

ऐकोनियां द्विजवचन । राजा कन्येसी विनवीत ॥ १७० ॥


ऐसें व्याकुळ दुःख करिती । मंत्री पुरोहित म्हणती ।

जे जे असेल होणार गति । ब्रह्मादिकां न टळे देखा ॥ १७१ ॥


होणार जाहली देवकरणी । काय कराल दुःख करुनि ।

ऐसें मंत्री संबोखोनि । राजयांते चला म्हणती ॥ १७२ ॥


निघाले राजे उभयतां । मंदिरा पातले दुःख करीत ।

इंद्रसेन अति दुःखित । न विसरे कधीं पुत्रशोक ॥ १७३ ॥


राजव्यापार सोडूनि । दुःख करी पुत्रचिंतनीं ।

गोत्रजादीं व्यापोनि । राष्ट्र घेतलें सकळिक ॥ १७४ ॥


सहभार्या रायासी । ठेविलें कारागृहासी ।

पुत्रशोक बहु तयासी । राज्यभोगीं चाड नाहीं ॥ १७५ ॥


चित्रवर्मा राजा देखा । कन्या ठेविली ममत्विका ।

प्राण त्यजूं पाहे निका । लोकनिंदा म्हणोनि ॥ १७६ ॥


राजा म्हणे कन्येसी । पुत्र नाहींत आमुच्या वंशी ।

कन्या एक तूं आम्हांसी । पुत्र म्हणूनि प्रतिपाळूं ॥ १७७ ॥


लोक निंदती आम्हांसी । वैधव्यत्व नाहीं परियेसीं ।

वर्ष एक क्रमीं वो तूं ऐसी । पुढें आचार करीं बाळे ॥१७८ ॥


पिता-वचन ऐकोनि । करीतसे बहु चिंतन ।

म्हणे देवा शूळपाणि । केवीं मातें गांजिलें ॥ १७९ ॥


ऐसें विचारी मानसीं । व्रत आचरीतसे सुरसीं ।

सोमवार उपवासी । ईश्र्वरपूजा करीतसे ॥ १८० ॥


इतुकें होतां राजकुमर । बुडाला होता गंगापूर ।

गेला जेथें पाताळनगर । वासुकी जेथें राज्य करी ॥ १८१ ॥


नागलोकींचिया नारी । आल्या होत्या नदीतीरीं ।

राजकुमार आला पूरीं । नदीतटाकीं वहात ॥ १८२ ॥


देखोनियां नागकन्या । काढिती संतोषेंकरुनियां ।

अमृत शिंपिती आणूनियां । जागृत झाला राजकुमर ॥ १८३ ॥


नागकन्या मिळून त्यासी । घेउनि जाती तक्षकापाशीं ।

विचित्र नगर परियेसीं । आश्र्चर्य पाहे राजकुमर ॥ १८४ ॥


पाहे पाताळनगर-रचना । जैसी शोभा इंद्रभुवना ।

गोपुरें दिसतीं महारत्ना । जैसी विद्दुल्लता लखलखित ॥ १८५ ॥


वज्र-नीळ वैडूर्येसीं । माणिक्य-मुक्ताफळेसीं ।

महारम्य पुरी जैसी । सूर्यकांतीपरी शोभा ॥ १८६ ॥


चंद्रकांतीसरसी भूमि । महाद्वार कपाटहेमी ।

अनेक रत्नें नाहीं उपमी । ऐशा मंदिरीं प्रवेशला ॥ १८७ ॥


पुढें देखतां सभा थोर । समस्त बैसले सर्पाकार ।

आश्र्चर्य करी राजकुमर । असंख्य सर्प दिसताति ॥ १८८ ॥


सभेमाजीं अतिशोभित । मध्यें दिसे पन्नगनाथ ।

जैसी सूर्यकांति फांकत । अति उन्नत बैसलासे ॥ १८९ ॥


अनेक श्र्वेतफणी दिसती । जैशी वीजु असे लखलखती ।

पीतांबर वास ज्योती । रत्नकुंडलमंडित देखा ॥ १९० ॥


अनेकरत्नखचित देखा । मुकुट मिरवती सहस्त्र एका ।

सहस्त्रफणी मिरवे तक्षका । ऐसा सभे बैसलासे ॥ १९१ ॥


रुपयौवन नागकन्या । नाना आभरणें लेवोनियां ।

अनेक सहस्त्र येवोनियां । सेवा करिती तक्षकाची ॥ १९२ ॥


ऐसे सभास्थानीं देख । राजा बैसलासे तक्षक ।

देखोनि राजकुमारकें । नमन केलें तये वेळीं ॥ १९३ ॥


तक्षक पुसे नागकन्यांसी । कैचा कुमारक आणिलासी ।

सुलक्षण दिसतो कैसी । कोठें होता म्हणोनियां ॥ १९४ ॥


नागकन्या म्हणती त्यासी । नेणों नाम याचे वंशासी ।

वहात आला यमुनेसी । घेऊनि आलों तुम्हांजवळी ॥ १९५ ॥


तक्षक पुसे कुमारकासी । नाम कवण, राज्यकवण वंशी ।

काय कारण आलासी । कवण देशीं वास तुझा ॥ १९६ ॥


सांगे राजकुमर देखा । आम्ही भूमंडळनायका ।

नैषधाराज्याधिपति ऐका । ‘ नळ ‘ नामा पुण्यवंत लोकीं ॥ १९७ ॥


त्याचा पुत्र इंद्रसेन । जन्म आमुचा तयापासून ।

चंद्रांगद ‘ नाम आपणा । गेलों होतों श्र्वशुरगृहा ॥ १९८ ॥


जलक्रीडा करावयासी । गेलों होतों यमुनेसीं ।

विधिवशें आम्हांसी । बुडालो नदींत वधारा ॥ १९९ ॥


वहात आलों नदींत । नागकन्या मज देखत ।

घेवोनि आल्या तुम्हांपर्यंत । दैव आपुलें साफल्य ॥ २०० ॥


पूर्वाजित पुण्येसीं । भेटी झाली चरणासी ।

धन्य माझे जीवनासी । कृतार्थ झालों म्हणतसे ॥ २०१ ॥


करुणावचन ऐकोनि । तक्षक बोले संतोषोनि ।

नको भिऊं म्हणोनि । धैर्य देत तये वेळीं ॥ २०२ ॥


शेष म्हणे कुमर बाळा । तूं दिसतोसी मन-निर्मळा ।

तुमचे घरीम सर्वकाळा । कवण देव पूजीतसां ॥ २०३ ॥


ऐसें ऐकोनि राजकुमर । हर्षें जाहला निर्भर ।

सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर देखा ॥ २०४ ॥


समस्त देवांचा देव । नाम आहे सदाशिव ।

वामभागीं उमा अपूर्व । त्यातें पूजितों निरंतर ॥ २०५ ॥


ज्याचें रजीं जनित ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपम्या ।

तैसा सदाशिव आम्हां । पूजीतसो सर्वकाळीं ॥ २०६ ॥


ज्याचे सत्वगुणेसीं । विष्णु उपजला परियेसीं ।

प्रतिपाळक लोकांसी । तैशा शिवासी पूजीतसों ॥ २०७ ॥


ज्याच्या तामसापासून । एकादश रुद्रगण ।

उपजले, याचि कारण । प्रलयकर्ता तया नाम ॥ २०८ ॥


धाता-विधाता जो आपण । उत्पत्तिस्थितिलय कारण ।

तेजासी तेज असे वायुराकाशीं । तैशा पूजितों शिवासी ॥ २०९ ॥


पृथ्वी-आप-तेजासी । जो पूर्ण असे वायुराकाशीं ।

तैशा पूजितों शिवासी । म्हणे राजकुमर देखा ॥ २१० ॥


सर्व भूतीं असे पूर्ण । चिन्मय आपण निरंजन ।

जो रुपें असे अचिंतन । तैसा ईश्र्वर पूजितों सदा ॥ २११ ॥


ज्याची कथा वेद जाहले । तक्षक-शेष ज्याचीं कुंडलें ।

त्रिनेत्र असे चंद्र मौळीं । तैसा शंकर पूजीतसों ॥ २१२ ॥


ऐसें ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन ।

राजकुमारा आलिंगोन । तुष्टलों तुष्टलों म्हणतसे ॥ २१३ ॥


तक्षक म्हणे तये वेळीं । तुज देईन राज्य सकळी ।

तुवां रहावें पाताळीं । अनंत भोग भोगीं आतां ॥ २१४ ॥


माझे लोकीं जें जें रत्न । जें मुख्य असे पवित्र ।

तें देईन समस्त । सुखें ऐस म्हणतसे ॥ २१५ ॥


पाताळ लोकींची रचना परम । पाहे पां अनुपम्य ।

कल्पवृक्षादि मनोरम । आहेत माझ्या नगरांत ॥ २१६ ॥


अमृत न देखती स्वप्नीं कोणी । भरलें असे जैसे पाणी ।

तळें बावी पोखरणी । आहेत माझे द्वारीं ॥ २१७ ॥


नाहीं मरणभय येथें । रोगपीडादि समस्त ।

नेणती कोणी स्वप्नावस्थें । ऐसें नगर माझें असे ॥ २१८ ॥


सुखें ऐस कुमरा म्हणत । तक्षक असे सांगत ।

राजकुमर असे विनवीत । करुणावचनेंकरुनियां ॥ २१९ ॥


राजकुमर विनवी तक्षकासी । एक पुत्र आपण पितयासी ।

भार्या वर्ष-चतुर्दशीं । शिवपूजा करीतसे ॥ २२० ॥


नूतन माझे पाणिग्रहण । तेथें असे अंतःकरण ।

पहावे मातापित्याचे चरण । दुःखी असतील मजलागीं ॥ २२१ ॥


आपण बुडालों नदींत । पिता माता दुःख करीत ।

पत्नी म्हणे पति मृत । समस्त जीव त्यजितील ॥ २२२ ॥


देखिले तुमचे चरण । संतुष्ट जाहले अंतःकरण ।

राखिला तुम्ही माझा प्राण । दर्शन करवावे मातापिता ॥ २२३ ॥


तक्षक झाला संतोषी । नाना रत्नाभरणें त्यासी ।

अमृत पाजवी बहुवसी । आणिक देती स्त्रियेसी ॥ २२४ ॥


कल्पवृक्षफळें देती । अपूर्व वस्त्राभरणें समस्ती ।

जें अपूर्व असे क्षितीं । ते अमोल्य वस्तु देता जाहला ॥ २२५ ॥


इतुके देवोनि कुमरासी । तक्षक म्हणे परियेसीं ।

जे जे काळी आम्हां स्मरसीं । तुझें कार्य सिद्धि पाववूं ॥ २२६ ॥


आणिक संतोषोनि मागुतीं । वस्त्रें वाहनें अतिप्रीतीं ।

तुरंग दिल्हा मनोगती । सवें देत कुमर आपुला ॥ २२७ ॥


चंद्रागदकुमरासी । तक्षकें दिधलें अतिहर्षी ।

निरोप दिल्हा मनोगती । सवें देत कुमर आपुला ॥ २२८ ॥


तक्षकातें नमूनि त्वरित । चंद्रांगद वारुवरी चढत ।

मनोवेगें मार्ग क्रमित । नागकुमर सवें असे ॥ २२९ ॥


जयें स्थानीं बुडाला होता । पावला तेथें क्षण न लागतां ।

निघाला बाहेर वारुसहिता । नदीतटीं उभा असे ॥ २३० ॥


सोमवार असे ते दिवसीं । सीमंतिनी आली स्नानासी

होत्या सखिया सवेंसी । त्याही मिळोनि नदीतीरीं ॥ २३१ ॥


सीमंतिनी म्हणे सखियांसी । आश्र्चर्य जाहलें पहा कैसी ।

उदकांतुनी निघाला परियेंसी । सवें असे नागकुमर ॥ २३२ ॥


राक्षस होईल वेषधारु । रुप धरिलें असे नरु ।

दिसतसे मनोहरु । तुरंगारुढ जाहला असे ॥ २३३ ॥


कैसे पहा वो रुप यासी । जैसा सूर्य प्रकाशी ।

दिव्यमालांबरें कैसी । सुगंध असे परिमळ ॥ २३४ ॥

दश योजनेंपर्यंत । वास येतो अतिप्रीत ।

पूर्वी देखिली असे स्वरुपता । दिसतसे परियेसा ॥ २३५ ॥


स्थिर स्थिर भीत भीता । पाहे त्याची स्वरुपता ।

आपुला पतीसादृश्य म्हणतां । रुप आठवी तये वेळी ॥ २३६ ॥


राजकुमर पाहे तिसी । म्हणे रुपें माझी वधूऐसी ।

गळसरी न दिसे कंठासी । हार न दिसती मुक्ताफळांचे ॥ २३७ ॥


अवलोकीतसे अंगखूण । न दिसे हळदी करकंकण ।

चिंताव्याकुळ रुपहीन । सादृश्य दिसे प्राणेश्र्वरी ॥ २३८ ॥


मनीं विचारी मागुता । रुप तिचें आठवीत ।

तुरंगावरुनि उतरत । नदीतीरीं बैसला ॥ २३९ ॥


बोलावोनि सीमंतिनीसी । पुसतसे अतिप्रियेसी ।

तुझा जन्म कवण वंशीं । पुरुष तुझा कवण सांग ॥ २४० ॥


कां कोमाइलीस बाळपणीं । दिससी शोकलक्षणी ।

सांगावें आम्हां विस्तारुनि । अति स्नेहें पुसतसे ॥ २४१ ॥

ऐकोनि सीमंतिनी देखा । आपण न बोलें लाजें ऐका ।

सखियांतें म्हणे विवेका । सांगा आमुचा वृत्तांत ॥ २४२ ॥


सखिया सांगती तयासी । हिचें नाम सीमंतिनी परियेंसी ।

चंद्रांगदाची महिषी । चित्रवर्म्याची हे कन्या ॥ २४३ ॥


इचा पति अतिसुंदर । चंद्रागद नाम थोर ।

जळक्रीडा करितां पार । बुडाला येथें अवधारा ॥ २४४ ॥


तेणें शोक करितां इसी । वैधव्य आलें परियेंसीं ।

दुःख करितां तीन वर्षी । लावण्यपण ऐसें जाहलें ॥ २४५ ॥


करी सोमवारव्रत । उपवासेंसीं आचरत ।

म्हणोनि आजि स्नानानिमित्त । आली असे नदीसी ॥ २४६ ॥


इच्या श्र्वशुराची स्थिति ऐका । पुत्रशोक करितां दुःखा ।

राज्य हिरतले दायादिका । कारागृहीं घातलें असे ॥ २४७ ॥


तयाकारणें सीमंतिनी । पूजा करी शूलपाणि ।

सोमवार उपोषणी । म्हणोनि करी परियेसा ॥ २४८ ॥


इतकें सखिया सांगती । मग बोले आपण सीमंती ।

तुम्ही कवण पुसतां आम्हांप्रती । कंदर्परुप तुम्हां असे ॥ २४९ ॥


गंधर्व किंवा तुम्ही देव । किन्नर अथवा सिद्धसाधव ।

नररुप असां मानव । आमुतें पुसतां कवण कार्या ॥ २५० ॥


स्नेहभावेंकरुनि । पुसतां तुम्ही अति गहनी ।

पूर्वी देखिलें होतें नयनीं । न कळे खूण म्हणतसे ॥ २५१ ॥


आप्तभाव माझे मनीं । स्वजन ऐसे दिसतां नयनीं ।

नाम कवण सांगा म्हणोनि । आठवीं रुप पतीचें ॥ २५२ ॥


आठवी पतीचें रुप । करुं लागली अति प्रलाप ।

पडली धरणीं रुदितबाष्प । महादुःख करीतसे ॥ २५३ ॥


स्त्रियेचें दुःख देखोनि । कुमार पाहे तटस्थपणीं ।

मुहूर्त एक सांवरोनि । आपण दुःख करीतसे ॥ २५४ ॥


दुःख करोनि कुमर देखा । प्रक्षाळण केलें आपुल्या मुखा ।

उगी राहें म्हणे ऐका । आपुलेम नाम ‘ सिद्ध ‘ म्हणे ॥ २५५ ॥


सीमंतिनी करितां शोक । जवळी आला राजकुमरक ।

हातीं धरुनि बाळिका । संबोखी तो प्रेमभावें ॥ २५६ ॥


एकांतीं सांगे तियेसी । म्हणे तुझ्या भ्रतारासी ।

देखिलें आम्हीं दृष्टीसीं । सुखें ऐस परियेसीं ॥ २५७ ॥


तुझे व्रतपुण्येंकरितां । शीघ्र येईल तुझा कांत ।

चिंता न करीं वो तूं आतां । तृतीय दिवशीं दर्शन घडे ॥ २५८ ॥


तुझा पति माझा सखा । माझा प्राण तोचि ऐका ।

संदेह न करीं वो बाळिका । सदाशिवाचे चरणाची आण ॥ २५९ ॥


ऐसें एकांतीं सांगून । प्रगट करुं नको म्हणून ।

दुःख आठवलें ऐकून । सीमंतिनी बाळिकेसी ॥ २६० ॥


सुटली धारा लोचनीं । शतगुण प्रेम नयनीं ।

विचार करीतसे मनीं । हाचि होय माझा पति ॥ २६१ ॥


सारिखें वाटे मुखकमळ । नयन सुंदर अति कोमळ ।

ध्वनि होय बोल चपल । हास्यमुखें बोलतसे ॥ २६२ ॥


मृदु वाक्य माझे पतीसी । तैसाचि बोलतो हर्षी ।

धरितां माझ्या करासी । अति मृदुपण लागलें ॥ २६३ ॥


माझ्या पतीचे लक्षण । मी जाणें सर्वही खूण ।

समस्त आहेति प्रमाण । हाचि होये प्राणनाथ ॥ २६४ ॥


यास देखतां माझे मन । विघरोनि, धारा सुटती नयन ।

नवल म्हणे विचारुन । मागुती अनुमान करीतसे ॥ २६५ ॥


दैवहीन असें आपण । कैचा येईल पति म्हणोन ।

बुडाला नदींत सिद्ध जाणोन । मागुती भ्रांति कैसी मज ॥ २६६ ॥


मेला पति ये मागुता । न ऐकों कानीं ऐसी कथा ।

स्वप्न देखिलें मीं भ्रांता । काय वसतसे माझे मनीं ॥ २६७ ॥


धूर्त होय कीं वेषधारु । राक्षस किंवा यक्ष किन्नरु ।

कपट वेषें आला नरु । म्हणोनि मनीं विचारीत ॥ २६८ ॥


किंवा होईल माझें व्रत । मुनिपत्नीनें सांगितले म्हणत ।

किंवा प्रसन्न गिरजानाथ । नवल नव्हे म्हणतसे ॥ २६९ ॥


ज्यासी प्रसन्न शंकर । त्यासी कैचा दुःखविकार ।

चिंतिलें पाविजे निर्धार । ऐसें योजी सीमंतिनी ॥ २७० ॥


ऐसें होतां राजकुमरु । आरुढ जाहलां आपण वारु ।

निरोप मागे प्रीतिकरु । सीमंतिनी नारीसी ॥ २७१ ॥


निघाला अश्र्व मनोवेगीं । पावला नगरा अतीशीघ्री ।

सवें पुत्रवासुगी । पाठवी तया नगरांत ॥ २७२ ॥


तुवां जावोनि वैरियांसी । सांगे इष्टतीं वादियांसी ।

न ऐकतां तुझे बोलासी । संहारीन म्हणावें ॥ २७३ ॥


ऐसें वचन ऐकोनि । पावला त्वरित राजभुवनीं ।

उभा राहोनि कठोर वचनीं । बोलतसे नगराधिपासी ॥ २७४ ॥


चला शीघ्र कुटुंबेसीं । चंद्रागदाचे भेटीसी ।

गेला होता पाताळासी । तक्षकाचे इष्टतीसी जाणा ॥ २७५ ॥


कालिंदीये नदींत । बुडाला वचन प्रख्यात ।

तुम्हीं केला स्वामीघात । राज्य हिरतले इंद्रसेनाचे ॥ २७६ ॥


आतां सांगेन तुम्हांसी । चाड असेल प्राणासी ।

शरण जावें शीघ्रेसीं । सिंहासनीं बैसवा इंद्रसेना ॥ २७७ ॥


तक्षकासारिखा मैत्र जाहला । तुमच्या करील अस्थिमाळा ।

शीघ्र चला चरणकमळा । चंद्रांगद-दर्शनासी ॥ २७८ ॥


नायकाल जरी माझें वचन । आतांचि घेईन तुमचे प्राण ।

तक्षकानें दिल्हें निरोपण । म्हणोनि आलों सांगातें ॥ २७९ ॥


ऐसें वचन ऐकोनि । दाईंजे विचारिती मनीं ।

आपण केली बुद्धि हीन । आतां शरण रिघावें ॥ २८० ॥


जरी करुं बलात्कार । तक्षक करील संहार ।

लोकांत होईल निंदा फार । प्राण जाईल, हानी असे ॥ २८१ ॥


ऐसें विचारुनि मानसीं । बाहेर काढिती इंद्रसेनासी ।

नाना वस्त्रें-आभरणेसीं । बैसविती सिंहासनीं ॥ २८२ ।


विनविताति तयासी । अपराध घडले आपणासी ।

प्राण राखावे आम्हांसी । म्हणोनि चरणीं लागती ॥ २८३ ॥


राया इंद्रसेनासी । तक्षकपुत्र सांगे हर्षी ।

तुमचा कुमर आला परियेसीं । वासुकीभेटीं गेला होता ॥ २८४ ॥


ऐकतां राजा संतोषी । आठविलें दुःख अधिकेंसी ।

मूर्च्छा येऊनि धरणीसी । पत्नीसहित पडियेला ॥ २८५ ॥


उठवी नागकुमर त्यासी । दुःख विसरा करा हर्षासी ।

येतो पुत्र भेटीसी । म्हणोनि सांगे उल्हासें ॥ २८६ ॥


ऐकोनि राजा अतिहर्षी । बोलावूनि सांगे मंत्रियांसी ।

नगर श्रृंगार करावयासी । निरोप दिला तये वेळीं ॥ २८७ ॥


ऐसा निरोप देऊन । भेटीसी निघाला आपण ।

समस्त निघाले दायाद अपण । राणीवसादिकरुनियां ॥ २८८ ॥


मंत्री पुरोहित देखा । समस्त निघाले नगरलोक ।

पाहों म्हणती कवतुक । मेला कुमर आला म्हणोनि ॥ २८९ ॥


आनंद झाला सकळिका । राजा मानी महासुखा ।

पाहीन म्हणोनि पुत्रमुखा । शीघ्र जातो अवधारा ॥ २९० ॥


सवें वाजंत्र्यांचा गजर । नगरलोकां संतोष थोर ।

करिताति जयजयकार । अत्योल्हास करिताति ॥ २९१ ॥


ऐसें जाऊनि पुत्रासी । आलिंगी राजा प्रीतीसीं ।

सद्गदित कंठेसी । नेत्रीं सुटल्या उदकधारा ॥ २९३ ॥


पुत्रासी म्हणे इंद्रसेन । आलासी बाळा माझा प्राण ।

शवपणें होतों तुजवीण । म्हणोनि सांगे दुःख आपुलें ॥ २९४ ॥


मातेसी आलिंगोन । दुःख करी अतिगहन ।

विनवीतसे संबोखोन । आपणानिमित्त कष्टलेति ॥ २९५ ॥


पुत्र नव्हे मी तुमचा शत्रु । जाऊनि आपुले सुखार्थु ।

दुःख दिधलें तुम्हां बहुत । नेदीच सुख तुम्हांसी ॥ २९६ ॥


आपण जावोनि पाताळीं । सुखें होतों शेषाजवळीं ।

तुम्ही कष्टलेति अवलीळी । मजनिमित्त अहोरात्रीं ॥ २९७ ॥


काष्ठासारखें अंतःकरण । पुत्राचे असे तुम्ही जाण ।

माताजीव जैसें मेण । पुत्रानिमित्त कष्ट बहु ॥ २९८ ॥


मातापितयांचे दुःख । जो नेणें तोचि मूर्ख ।

उत्तीर्ण व्हावया अशक्य । स्तनपान एक घडीचें ॥ २९९ ॥


मातेवीण देव देखा । नाहीं पुत्रासी विशेषा ।

ऋण उत्तीर्ण नव्हे ऐका । माता म्हणजे भवानी ॥ ३०० ॥


दुःख करी जननीसी । तोचि जाय यमपुरासी ।

पुत्र नोहे त्याचे वंशीं । सप्तजन्म दरिद्री ॥ ३०१ ॥


ऐसी माता विनवोनि । भेटता जाहला भाऊबहिणी ।

इष्ट सोइरे अखिल जनी । प्रधानादि नगरलोका ॥ ३०२ ॥


इतुकिया अवसरीं । प्रवेश जाहला नगरपुरीं ।

तंमारंभ केला थोरी । पावले निजमंदिरांत ॥ ३०३ ॥


तक्षकाचे पुत्रासी । वस्त्रें भूषणें अति हर्षी ।

देता जाहला परियेंसीं । इंद्रसेन अतिप्रीती ॥ ३०४ ॥


चंद्रांगद सांगे पितयासी । तक्षकोपकार विस्तारेसीं ।

प्राण वांचविले आम्हांसी । द्रव्य दिधलें अपरिमित ॥ ३०५ ॥


जीं जीं वस्त्राभरणें । दिधलीं होतीं तक्षकें जाण ।

पित्यासी देवोनि चरण । नमिता झाला पुत्र देखा ॥ ३०६ ॥


निरोप दिधला नागपुत्रासी । इंद्रसेन करी अतिहर्षी ।

भृत्य पाठविले वेगेसीं । चित्रवर्म-नगरातें ॥ ३०७ ॥


राजा म्हणे तये वेळीं । सून माझी दैवागळी ।

तिचेनि धर्में वांचला बळी । पुत्र माझा अवधारा ॥ ३०८ ॥


तिणें आराधिला शंकर । अहेवपण तिचें स्थिर ।

म्हणोनि वांचला माझा कुमर । सौभाग्यवंती सून माझी ॥ ३०९ ।


म्हणोनि हेर पाठवा वेगेसीं । वार्ता लिहावी संतोषी ।

चित्रवर्मरायासी । म्हणे राजा इंद्रसेन ॥ ३१० ॥


हेर निघाले झडकरी । पातले चित्रवर्मापुरीं ।

व्यवस्था सांगती कुसरीं । चंद्रांगद-शुभवार्ता ॥ ३११ ॥


ऐकोनि राजा संतोषी देखा । करिता झाला महासुखा ।

दान दिधलें अपार ऐका । वस्त्रें भूषणें हेरांसी ॥ ३१२ ॥


इंद्रसेन राजा देखा । पुनरपि आला वर्‍हाडिका ।

चंद्रांगद पुत्र निका । सवें सकल कलंत्रेसीं ॥ ३१३ ॥


महोत्साह करिती थोर । वर्‍हाड केलें धुरंधर ।

चंद्रांगद प्रीतिकर । सीमंतिनीसी भेटला ॥ ३१४ ॥


पाताळीची अमोल्य वस्तु । प्राणेश्र्वरीसी अर्पित ।

पाजविता झाला अमृत । महानंद प्रवर्तला ॥ ३१५ ॥


कल्पवृक्षफळें देखा । देता जाहला स्वपत्निका ।

अनर्घ्य वस्तु आभरणिका । दश योजनें कांति फाके ॥ ३१६ ॥


ऐशा उत्साहें विवाह केला । आपुले पुरीसी निघाला ।

सीमंतिनीचे दैव भलें । पतिसमागमें जातसे ॥ ३१७ ॥


जावोनि आपुले नगरासी । राज्यीं स्थापिलें पुत्रासी ।

दहा सहस्त्र अब्दें हर्षी । राज्य केलें अवधारा ॥ ३१८ ॥


सीमंतिनीचें व्रत ऐसें । उपवास केलें सोमवारांस ।

पूजा केली गौरीहरास । म्हणोनि पावली इष्टार्थ ॥ ३१९ ॥


ऐसें विचित्र असे व्रत । म्हणोनि सांगती श्रीगुरुनाथ ।

ऐक सुवासिनी म्हणत । अति प्रीतीकरुनियां ॥ ३२० ॥


ऐसें व्रत करीं वो तूं आतां । अहेवपण अखंडिता ।

होतील तुज कन्या पुत्र बहुता । आमुचें वाक्य अवधारीं ॥ ३२१ ॥


दंपती विनवी श्रीगुरुसी । तुझी चरणसेवा आम्हांसी ।

तेंचि व्रत निर्धारेसीं । आम्हां व्रत कायसे ॥ ३२२ ॥


आमचा तूं प्राणनायक । तुजवांचूनि नेणो आणिक ।

तुझे चरण असती निक । म्हणोनि चरणीं लागलीं ॥ ३२३ ॥


श्रीगुरु म्हणती तयासी । आमुचे निरोपें करा ऐसी ।

व्रत आचरा सोमवारेंसी । तेचि सेवा आम्हां पावे ॥ ३२४ ॥


निरोप घेऊनि श्रीगुरुचे । व्रत करिती सोमवाराचें ।

आलीं माता-पिता त्यांचे ऐसें। भेटी जाहली श्रीगुरुची ॥ ३२५ ॥


ऐकोनि कन्यापुत्रवार्ता । संतोष करिती अत्यंता ।

द्रव्य वेंचिती अपरिमिता । समाराधना ब्राह्मणांसी ॥ ३२६ ॥


पूजा करिती श्रीगुरुसी । आनंद अति मानसीं ।

समारंभ बहुवसी । करिती भक्तिपूर्वक ॥ ३२७ ॥


ऐशापरी वंदोनि । श्रीगुरुचा निरोप घेऊनि ।

गेलीं ग्रामा परतोनि । ख्याति झाली चारी राष्ट्रीं ॥ ३२८ ॥


पुढें तया दंपतीसी । पुत्र पांच शतायुषी ।

झाले ऐका त्वरितेसीं । नामधारक श्रीगुरुचे ॥ ३२९ ॥


प्रतिवर्षीं दर्शनासी । दंपती येती भक्तीसीं ।

ऐसें शिष्य परियेसीं । श्रीगुरुचे अवधारी ॥ ३३० ॥


ऐसें श्रीगुरुचरित्र । सिद्ध सांगे पवित्र ।

नामधारक अतिप्रीत । ऐकतसे अवधारा॥ ३३१ ॥


गंगाधराचा कुमर । सरस्वती विनवी गुरुकिंकर ।

स्वामी माझा पारंपार । नृसिंहसरस्वती ॥ ३३२ ॥


ऐसी ब्रीद कीर्ति देखा । समस्त जन तुम्ही ऐका ।

प्रसन्न होय तात्काळिका । न धरा संदेह मानसीं ॥ ३३३ ॥


साखर स्वादु म्हणावयासी । उपमा द्यावी कायसी ।

मनगटीं असतां कंकणासी । आरसा काय पहावा ॥ ३३४ ॥


प्रत्यक्ष पाहतां दृष्टांतेसीं । प्रमाण काय परियेसीं ।

ख्याति असे भूमंडळासी । कीर्ति श्रीगुरुयतीची ॥ ३३५ ॥


ऐका हो जन समस्त । सांगतसे मी हित ।

सेवा करावी श्रीगुरुनाथ । त्वरित होय मनकामना ॥ ३३६ ॥


अमृताची आरवंटी । घातली असे गोमटी ।

पान करा हो तुम्ही घोटी । धणीवरी सकळिक ॥ ३३७ ॥


श्रीगुरुचरित्र कामधेनु । ऐकतां होय पतित पावनु ।

नाम ज्याचें कामधेनु । जें जें चिंतिलें पाविजे ॥ ३३८ ॥


ज्याचें चित्त श्रीगुरुचरणीं बैसलें । त्याचें सर्वही कार्य साधलें ।

अक्षयपद अनायासें पावलें । श्रीगुरुचे प्रसादें ॥ ३३९ ॥


इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ ॥

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे

सीमंतिनीआख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय