GuruCharitra.in

गुरुचरित्र अध्याय अड़तालीस | Guru Charitra Adhyay 48

गुरुचरित्र अध्याय 48 एक बहुत ही प्रेरणादायक अध्याय है जिसमें एक शूद्र भक्त की कथा है, जिसे गुरु की कृपा से विपुल समृद्धि और विघ्न दूर हुए। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु की कृपा से कोई भी व्यक्ति अपने जीवन में सफलता और खुशी प्राप्त कर सकता है।

इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक शूद्र भक्त, जो कि उस समय के समाज में एक निम्न जाति का माना जाता था, गुरु की शरण में आया और उनकी शरणागत हो गया। गुरु ने शूद्र की भक्ति से प्रसन्न होकर उसे विपुल समृद्धि प्रदान की और उसके सभी विघ्न दूर किए। यह अध्याय हमें यह सिखाता है कि गुरु के लिए कोई भी छोटा या बड़ा नहीं होता है। गुरु सभी भक्तों को समान रूप से प्रेम करते हैं और उन सभी को उनकी मनोकामनाएं पूरी करते हैं।

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य सगुण । लागे सिद्धाचिया चरणा ।

विनवीतसे कर जोडून । भक्तिभावें करुनियां ॥ १ ॥

त्रिमूर्तीचा अवतार । वेषधारी जाहला नर ।

राहिला प्रीतीनें गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणोनियां ॥ २ ॥


भूमीवरी प्रख्यात । तीर्थें असती असंख्यात ।

समस्त सोडोनि येथ । काय कारणें वास केला ॥ ३ ॥


या स्थानाचें महिमान । सांगा स्वामी विस्तारुन ।

म्हणोनि धरिले सिद्धाचे चरण । नामधारकें तया वेळीं ॥ ४ ॥


ऐकोनि तयाचें वचन । सिद्धमुनि संतोषोन ।

सांगतसे विस्तारुन । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ५ ॥


आश्र्विन वद्य चतुर्दशीं । दिपवाळी पर्वणीसी ।

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । स्नान करावें त्रिस्थळींचे ॥ ६ ॥


गया प्रयाग आणि वाराणशी । चला यात्रे कलत्रपुत्रेसी ।

विप्र म्हणती श्रीगुरुसी । आइती करणें म्हणोनियां ॥ ७ ॥


ऐकोनि श्रीगुरु हांसती । ग्रामाजवळी तीर्थें असतीं ।

करणें न लागे तुम्हां आइती । चला दावीन तुम्हांसी ॥ ८ ॥


ऐसें म्हणोनि भक्तांसी । गेले अमरजासंगमासी ।

स्नान केलें महाहर्षी । शिष्यांसहित श्रीगुरुमूर्ती ॥ ९ ॥


श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । महिमा अपार या संगमासी ।

प्रयागासमान परियेसीं । षट्कुळामध्यें स्नान करणें ॥ १० ॥


विशेष भीमा नदी उत्तरे वाहे । अमरजा संगम मनोहर आहे ।

गंगा यमुना निर्धार हे । तीर्थ बरवें परियेसा ॥ ११ ॥


विशेष आपण उत्तरे वाहे । याची महिमा अपार आहे ।

शताधिक पुण्य होये । काशीहून परियेसा ॥ १२ ॥


आणिक अष्ट तीर्थें असतीं । त्यांची महिमा असे ख्याती ।

सांगेन ऐका एकचित्तीं । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥ १३ ॥


ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनविताति भक्तजन ।

‘ अमरजा ‘ नदी नाम कवण । कवणापासाव उत्पत्ति ॥ १४ ॥


श्रीगुरु म्हणती भक्तांसी । बरवें पुसिलें आम्हांसी ।

जालंधर-पुराणेसीं । असे कथा प्रख्यात ॥ १५ ॥


‘ जालंधर ‘ निशाचर । समस्त जिंतिली वसुंधरा ।

पराभविलें इंद्रपूर । समस्त देव पळविले ॥ १६ ॥


देवां-दैत्यांसी झालें युद्ध । सुरवर मारिले बहुविध ।

इंद्रे जाऊनि प्रबोध । ईश्र्वराप्रति सांगितला ॥ १७ ॥


इंद्र म्हणे ऐक शिवा । दैत्यें मारिलें सकळ देवां ।

शीघ्र प्रतिकार करावा । म्हणोनि चरणीं लागला ॥ १८ ॥


आम्ही मारितों दैत्यांसी । रक्त पडे भूमीसी ।

अखिल राक्षस-बिंदूंसी । अधिक निपजती भूमीवरी ॥ १९ ॥


स्वर्ग मृत्यु पातळ । सर्व भरलें दैत्यकुळ ।

मारिले आमुचे देव सकळ । म्हणोनि आलों तुजपाशीं ॥ २० ॥


ऐसें वचन ऐकोनि । ईश्र्वर प्रज्वाळला मनीं ।

निघाला रौद्र होऊनि । दैत्य निर्दाळण करावया ॥ २१ ॥


इंद्र विनवी ईश्र्वरासी । स्वामी माराल दैत्यांसी ।

जीवन आणावया देवांसी । प्रकार कांहीं करावा ॥ २२ ॥


संतोषोनि गिरिजारमण । अमृतवचन उच्चारोन ।

घट दिधला तत्क्षण । संजीवनी उदक देखा ॥ २३ ॥


उदक घेवोनि इंद्रराव । त्वरित जातसे स्वभाव ।

शिंपोनियां समस्त देव । उठविले तये वेळीं ॥ २४ ॥


उरलें अमृत घटीं होतें । घेऊनि जातां अमरनाथें ।

पडिले भूमीं अवचितें । प्रवाह झाला क्षितीवरी ॥ २५ ॥


‘ संजीवनी ‘ नामें नदी । उद्भवली भूमीं प्रसिद्धी ।

‘ अमरजा ‘ नाम याचि विधी । प्रख्यात झाली अवधारा ॥ २६ ॥


याकारणें या नदीसी । जे स्नान करिती भक्तींसी ।

काळमृत्यु न होय त्यांसी । अपमृत्यु केवीं घडे ॥ २७ ॥


शतायुषी पुरुष होती । रोगराई न पीडिती ।

अपस्मारादि दोष जाती । ब्रह्महत्यादि पातकें ॥ २८ ॥


‘ अमृतनदी ‘ नाम इयेसी । संगम झाला भीमरथीसीं ।

तीर्थ जाहलें प्रयागासरसी । त्रिवेणीचा संगम ॥ २९ ॥


कार्तिकादि माघमासीं । स्नान करितां भक्तिसीं ।

इह सौख्य परलोकासी । मोक्षस्थाना पावती ॥ ३० ॥


सोम-सूर्य-ग्रहणासीं । संक्रमण-सोम-अमावास्येसी ।

पुण्य तिथि एकादशी । स्नान करितां अनंत पुण्य ॥ ३१ ॥


न साधती दिवस जरी । सदा करावें मनोहरी ।

समस्त दोष जाती दूरी । शतायुषी श्रियायुक्त ॥ ३२ ॥


ऐसा संगममहिमा देखा । पुढें तीर्थ असे अति विशेखा ।

दिसे अश्र्वत्थ सन्मुखा । ‘ मनोरथ ‘ तीर्थ असे ॥ ३३ ॥


त्या तीर्थी स्नान केलिया । मनोरथ पाविजे काम्या ।

कल्पवृक्षस्थान अनुपम्या । कल्पिलें फळ पाविजे ॥ ३४ ॥


अश्र्वत्थ नव्हे तो कल्पतरु । जाणावें तुम्हीं निर्धारु ।

जें जें चिंतितील नरु । पावतील काम्य अवधारा ॥ ३५ ॥


ऐसें मनोरथ तीर्थ । ठाऊक असे प्रख्यात ।

सन्मुख असे अश्र्वत्थ । सदा असों याचिगुणें ॥ ३६ ॥


जे जन येऊनि सेवा करिती । तयांचे मनोरथ पुरती ।

न धरा संदेह आतां चित्तीं । ऐसें म्हणती श्रीगुरुनाथ ॥ ३७ ॥


आम्ही वसतो सदा येथें । ऐसें जाणा तुम्ही निरुतें ।

दृष्टीं पडतीं गरुत्मतें । खूण तुम्हां सांगेन ॥ ३८ ॥


कल्पवृक्षातें पूजोनि । जावें मग शंकरभुवनीं ।

संगमेश्र्वर असे त्रिनयनी । पूजा करावी मनोभावें ॥ ३९ ॥


जैसा पर्वती मल्लकार्जुन । तैसा संगमी रुद्र आपण ।

भक्तिपूर्वक प्रदक्षिणा । करावी तुम्ही अवधारा ॥ ४० ॥


नंदिकेश्र्वरा नमोनि । नमन करावें चंडीस्थानीं ।

पुन्हा नंदी सव्य करुनि । जावें मग सोमसूत्रासी ॥ ४१ ॥


सवेंचि परतोनि वृषभासी । नमोनि जावें चंडीपाशी ।

पुढें जावे सोमसूत्रासी । येणेंविधि प्रदक्षिणा ॥ ४२ ॥


ऐसी प्रदक्षिणा देखा । तीन वेळां करुन ऐका ।

वृषभस्थानासी येऊनि निका । अवलोकावें श्रीशिवासी ॥ ४३ ॥


वामहस्तीं वृषण धरुनि । तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवोनि ।

पूजा पहावी दोनी नयनीं । इंद्रासमान होय नर ॥ ४४ ॥


धनधान्यादि संपत्ति । लक्मी राहे अखंडिती ।

पुत्रपौत्र त्यांसी होती । संगमेश्र्वर पूजोलिया ॥ ४५ ॥


पुढें तीर्थ वाराणशी । अर्धकोश असे परियेसीं ।

ग्राम असे नागेशी । तेथोनि उद्भव असे जाणा ॥ ४६ ॥


त्याचें असे आख्यान । कथा नव्हे प्रत्यक्ष जाण ।

होता एक ब्राह्मण । भारद्वाज गोत्राचा ॥ ४७ ॥


विरक्त असे ईक्ष्वरभक्त । सर्वसंग त्याग करीत ।

आपण असे अनुष्ठानीत । सदा ध्याय शिवासी ॥ ४८ ॥


प्रसन्न झाला चंद्रमौळी । सदा दिसे दृष्टीजवळी ।

विप्र आल्हादें सर्व काळीं । देह विसरोनि हिंडतसे ॥ ४९ ॥


लोक म्हणती पिसा त्यासी । निंदा करिती बहुवसीं ।

दोघे बंधु असती तयासी । नामें त्यांची अवधारा ॥ ५० ॥


एकाचें नाम असे ‘ ईश्र्वर ‘ । दुसरा नामें ‘ पांडुरंगेश्र्वर ‘ ।

बंधूतें केला अव्हेर । आपण निघाले काशीसी ॥ ५१ ॥


करोनियां सर्व आयती । समस्त निघाले त्वरितीं ।

त्या पिशातें सवें पाचारिती । चला जाऊं म्हणोनियां ॥ ५२ ॥


ब्रह्मज्ञानी द्विज निका । पिसा म्हणती मूर्ख लोक ।

बंधूंसी म्हणे द्विज ऐका । नका जाऊं काशीसी ॥ ५३ ॥

विश्र्वेश्र्र असे मजजवळी । दाखवीन तुम्हांतें तात्काळीं ।

आश्र्चर्य करिती लोक सकळी । दाखवीं म्हणती बंधुजन ॥ ५४ ॥


काशीस जावें अति-प्रयास । येथें भेटे तरी कां सायास ।

म्हणोनि बोलती अति हर्षें । तये वेळीं अवधारा ॥ ५५ ॥


इतुकिया अवसरी । विप्र गंगास्नान करी ।

ध्यानस्थ होतां साक्षात्कारी । ईश्र्वर आला तयाजवळी ॥ ५६ ॥


विनवीतसे शिवासी । आम्हां पाहिजे नित्य काशी ।

दर्शन व्हावें विश्र्वेश्र्वरासी । म्हणोनि चरणीं लागला ॥ ५७ ॥


ईक्ष्वर भोळा-चक्रवर्ती । प्रसन्न झाला अतिप्रीतीं ।

दिसे काशीक्षेत्र निश्र्चिती । मणिकर्णिका कुंड झालें ॥ ५८ ॥


विश्र्वेश्र्वराची मूर्ति एक । निघाली कुंडांतूनि विशेख ।

नदीं-उत्तर दिशे निक । उद्भवली परियेसा ॥ ५९ ॥


उदक निघालें कुंडांतून । जैसी भागीरथी गहन ।

जे जे असती काशींत खूण । समस्त लोकांसी दिसतसे ॥ ६० ॥


संगम जाहला नदी भीमा । तीर्थ काशी अति उत्तमा ।

आचार करिती मनोधर्मी । बंधुज्ञानी म्हणती मग ॥ ६१ ॥


म्हणे ब्राह्मण बंधूंसी । काशीस न जावें आमुचे वंशी ।

समस्तीं आचरावें हेचि काशी । आम्हां शंकरें सांगितले ॥ ६२ ॥


आपुलें नाम ‘ भ्रांत ‘ म्हणा । ‘ गोसावी ‘ नाम निर्धार खुणा ।

तुम्हीं दोघे बंधुजना । ‘ आराध्य ‘ ऐसें आरोपिलें ॥ ६३ ॥


दोघें जावें पंढरपुरा । तेथें असे पुंडलीकवरा ।

सदा तुम्ही पूजा करा । ‘ आराध्य ‘ नाम विख्यात ॥ ६४ ॥


प्रतिवर्षी काशीसी । येथे यावे निर्धारेसीं ।

तीर्थ असें अति विशेषीं । ऐसें म्हणे तो ब्राह्मण ॥ ६५ ॥


श्रीगुरु म्हणती भक्तजनासी । काशीतीर्थ प्रकटलें ऐसी ।

संशय न धरावा तुम्हीं मानसीं । वाराणसी प्रत्यक्ष ही ॥ ६६ ॥


ऐकोनि समस्त द्विजवर । करिती स्नान दान आचार ।

तेथोनि पुढें येती गुरुवर । सिद्ध सांगे नामधारका ॥ ६७ ॥


श्रीगुरु म्हणती सकळिकांसी । तीर्थ दाविती पापविनाशी ।

स्नानमात्रें पाप नाशी । जैसें तृणा अग्नि लागे ॥ ६८ ॥


आपुले भगिनी रत्नाबाईसी । दोष असे बहुवशीं ।

बोलावोनि त्या समयासी । पुसताति श्रीगुरुमुनि ॥ ६९ ॥


ऐक पूर्वदेह भगिनी । तूं आलीस आम्हां दर्शनी ।

पाप तुझे असे गहनी । आठवण करी मनामध्यें ॥ ७० ॥


ऐकोनि श्रीगुरुचे बोल । पायां पडे वेळोवेळ ।

अज्ञान आपण मूढ केवळ । इतुकें ज्ञान कैंचें मज ॥ ७१ ॥


तूं जगदात्मा विश्र्वव्यापक । तूंचि ज्ञानज्योति दिपक ।

सर्व जाणसी तूंचि एक । विस्तारुनि सांग मज ॥ ७२ ॥


श्रीगुरु म्हणती तियेसी । आपुलें पाप मज पुससी ।

वधिलें पांच मार्जारांसी । नेणसी खूण धरीं आपुली ॥ ७३ ॥


होती मार्जारी गर्भेंसीं । प्रसूति झाली भांडेसी ।

न पहातां तूं उदक घातलेंसी । झांकोनि ठेविलें अग्नीवरी ॥ ७४ ॥


पांच मार्जारांचा घात । लागले आणिक दोष बहुत ।

ऐसें ऐकोनि पाहे त्वरित । श्र्वेरतकुष्ठ झालें तिसी ॥ ७५ ॥


देखोनि भयाभीत झाली । श्रीगुरुचरणीं येऊनि लागली ।

विनवीतसे करुणाबहाळीं । कृपा करीं गा श्रीगुरुमूर्ति ॥ ७६ ॥


समस्त पापें करुनि राशि । तीर्था जाती वाराणशीसी ।

आल्यें तुझे दर्शनासी । पापावेगळें होईन म्हणोनि ॥ ७७ ॥


श्रीगुरु पुसती तियेसी । तुज असती पापराशि ।

पुढिले जन्मीं भोगिसी । तरी जाईल आतांचे ॥ ७८ ॥


रत्नाबाई विनवी स्वामियासी । उबगल्यें बहु जन्मासी ।

याचिकाजें दर्शनासी । आल्यें मी मुक्त होईन म्हणोनि ॥ ७९ ॥


आतां पुरेजन्म आपणासी । म्हणोनि धरिलें चरणासी ।

याचि जन्मीं भोगीन भोगासी । पाप आपण म्हणतसे ॥ ८० ॥


इतुकें ऐकोनि श्रीगुरुमूर्ति । रत्नाबाईस निरोप देती ।

पापविनाशीं जाय त्वरिती । स्नानमात्रें जाईल कुष्ठ ॥ ८१ ॥


नित्य करी वो येथे स्नान । सप्तजन्मींचे पाप भग्न ।

संदेह न धरी वो अनुमान । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥ ८२ ॥


सिद्ध म्हणे नामधारकासी । आम्हीं देखिले दृष्टींसीं ।

स्नान करितां त्रिरात्रीसी । कुष्ठ तिचें परिहारिलें ॥ ८३ ॥


ऐसें प्रख्यात तीर्थ देखा । नाम ‘ पापविनाशी ‘ ऐका ।

जे स्नान करिती भाविका । सप्तजन्म-पापें जातीं ॥ ८४ ॥

तीर्थ-महिमा देखोन । रत्नाबाई संतोषोन ।

राहिली मग मठी बांधोन । तीर्थासन्निध अवधारा ॥ ८५ ॥


पुढें ‘ कोटितीर्थ ‘ देखा । श्रीगुरु दाविती सकळिकां ।

स्नानमात्रें होय निका । याचें आख्यान बहु असे ॥ ८६ ॥


जंबुद्विपीं जितुकीं तीर्थे । एकेक महिमा अपरिमितें ।

तितुकियां वास कोटितीर्थें । विस्तार असे सांगतां ॥ ८७ ॥


सोम-सूर्यग्रहणेसी । अथवा संक्रांति-पर्वणीसी ।

अमावास्या-पौर्णिमा-प्रतिपदेसी । स्नान तेथें करावें ॥ ८८ ॥


सवत्सेंसीं धेनु देखा । सालंकृत करुनि ऐका ।

दान द्यावें द्विजा निका । कोटि गोदान फळ असे ॥ ८९ ॥


हे तीर्थमहिमा आहे ऐसी । एकेक दान कोटीसरसी ।

जे घडेल शक्तीसी । दान येथें करावें ॥ ९० ॥


पुढें तीर्थ ‘ रुद्रपाद ‘ । कथा असे अतिविनोद ।

गयातीर्थ-समप्रद । तीर्थ असे अवधारा ॥ ९१ ॥


जे जे आचार गयेसी । करावें तेथें परियेसीं ।

पूजा करा रुद्रपादासी । कोटि जन्म पापें जाती ॥ ९२ ॥


पुढें असे ‘ चक्रतीर्थ ‘ । अतिविशेष पवित्र ।

केशव देव सन्निध तत्र । पुण्यराशि स्थान असे ॥ ९३ ॥


तया तीर्थी स्नान करितां । पतित होती ज्ञानवंता ।

अस्थि होती चक्रांकिता । द्वारावती समान देखा ॥ ९४ ॥


तिये स्थानीं स्नान करोनि । पूजा करावी केसवचरणीं ।

द्वारावती-चतुर्गुणी । पुण्य असे अवधारा ॥ ९५ ॥


ऐकोनि श्रीगुरुचे वचन । समस्त करिती स्नान दान ।

पुढें मागुती ‘ मन्मय ‘ गहन । तीर्थ सांगती श्रीगुरु ॥ ९६ ॥


ग्रामपूर्वभागेसी । कल्लेश्र्वर देव परियेंसी ।

जैसें गोकर्णमहाबळेंसी । समान क्षेत्र परियेसा ॥ ९७ ॥


मन्मथ तीर्थी स्नान करावें । कल्लेश्र्वराते पूजावें ।

प्रजावृद्धि होय बरवें । अष्टैश्र्वर्यें पावती ॥ ९८ ॥


अखंड श्रावणामासीं । अभिषेक करावा देवासी ।

दीपाराधना कार्तिकमासीं । अनंत पुण्य अवधारा ॥ ९९ ॥


ऐसी अष्टर्तीथमहिमा । सांगती श्रीगुरु-पुरुषोत्तमा ।

संतोष जाहले भक्त प्रेमा । अति उल्हास करिताति ॥ १०० ॥


म्हणती समस्त भक्तजन । नेणो तीर्थांचे महिमान ।

स्वामीं निरोपिलें कृपेन । पुनीत केलें आम्हांसी ॥ १०१ ॥


जवळी असतां समस्त तीर्थे । कां जावें दूर यात्रे ।

स्नानमात्रे होय पवित्र । म्हणोनि समस्त आचरती ॥ १०२ ॥


अष्टतीर्थे निरोपोन । श्रीगुरु आले मठश्थान ।

समाराधना करिती भक्तजन । महानंद प्रवर्तला ॥ १०३ ॥


सिद्ध म्हणे नामधारकासी । तीर्थमहिमा आहे ऐसी ।

श्रीगुरुंनी निरोपिलें आम्हांसी । म्हणोनि तुज सांगितले ॥ १०४ ॥


म्हणे सरस्वती-गंगाधर । क्षेत्र थोर गाणगापुर ।

तीर्थें असती अपरांपर । आचरा तुम्ही भक्तीनें ॥ १०५ ॥

॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे

अमरजासंगमे-गंधर्वपुर-तीर्थमहिमानिरुपणं

नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय