GuruCharitra.in

Guru Charitra Adhyay 6 | गुरुचरित्र अध्याय 6

गुरुचरित्र अध्याय 6 में बताया गया है कि कैसे गुरु के चरणों में समर्पण करने से सभी मनोकामनाएं पूर्ण होती हैं। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु को अपना सर्वस्व समर्पण कर देना चाहिए और उनकी आज्ञा का पालन करना चाहिए। गुरु के चरणों में समर्पण करने से हमें सभी तरह की बाधाओं को दूर करने में मदद मिलती है और हम अपनी सभी मनोकामनाओं को पूरा कर सकते हैं।

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । स्वामी तूं ज्योति अंधकारासी ।

प्रकाश केले जी आम्हांसी । गुरुपीठ आद्यंत ॥ १ ॥

त्रिमूर्ति अवतार होऊनि आपण । तीर्थें करावया किंकारण ।

विशेष काय असे गोकर्ण । म्हणोनि गेले तया स्थाना ॥ २ ॥


तीर्थें असती अपरंपार । समस्त सांडूनि प्रीतिकर ।

कैसा पावला दत्तात्रेय-अवतार । श्रीपादश्रियावल्लभ ॥ ३ ॥


विस्तारोनि आपणासी । सांगा स्वामी कृपेसी ।

म्हणोनि लागतसे चरणांसी । नामधारक प्रीतिकरें ॥ ४ ॥


ऐकोनि नामधारकाचें वचन । संतोष जाहला सिद्ध आपण ।

सांगतसे विस्तारोन । गुरुचरित्र परियेसा ॥ ५ ॥


ऐक शिष्या-शिखामणी । तुवां पुशिलें जें कां प्रश्र्नी ।

संतोष झाला अंतःकरणी । सांगतों चरित्र श्रीगुरुचें ॥ ६ ॥


तुजकरितां गा आम्हांसी । लाभ झाला असमसाहसी ।

गुरुचरित्र सांगावयासी । उत्कंठा मानसीं होतसे ॥ ७ ॥


म्हणती त्रयमूर्ति अवतरोन । तीर्थें हिंडती केवीं आपण ।

विशेष पातला गोकर्णा । म्हणोनि पुससी आम्हांसी ॥ ८ ॥


दत्तात्रेय देव जाण । तीर्थें हिंडे याचि कारणें ।

भक्तजनां दीक्षा करणें । उपदेशीतसे हितार्थ ॥ ९ ॥


विशेष तीर्थ आपुलें स्थान । गोकर्णी असे शंकर आपण ।

याचि कारणें निर्गुण । त्रैमूर्ति वसती तये स्थानीं ॥ १० ॥


गोकर्णीचें माहात्म्य । सांगता असे अनुपम्य ।

एकचित्त करुनि नेम । ऐक शिष्या नामधारका ॥ ११ ॥


त्या तीर्थाचें आद्यंत । सांगेन तुज विस्तारत ।

जे जे वरु लाधले असत । अपूर्व असे ऐकावया ॥ १२ ॥


‘ महाबळेश्र्वर ‘ लिंग देखा । स्वयंभू शिव असे ऐका ।

आख्यान असे विशेषा । लंबोदरें प्रतिष्ठिलें ॥ १३ ॥


शिष्य म्हणे सिद्धासी । तीर्थमहिमा वानिसी ।

विघ्नेश्र्वरें प्रतिष्ठिलें कैसी । विस्तारोनि सांग मज ॥ १४ ॥


ऐसें शिष्य विनवीत । ऐकोनि बहु संतोषत ।

निरोपीतसे आद्यंत । महाबळेश्र्वरलिंगचरित्र ॥ १५ ॥


पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या । नाम तियेचें कैकया ।

ईश्र्वरभक्ति अतिप्रिया । शिवपूजा सार्वकाळीं ॥ १६ ॥


नित्य करी लिंगपूजन । पूजेविणें नेघे अन्न ।

ऐसें क्रमितां एक दिन । न मिळे लिंग पूजेसी ॥ १७ ॥


व्रतभंग होईल म्हणोनि । मृत्तिकालिंग करुनि ।

पूजीत होती संतोषोनि । भक्तिपूर्वक अवधारा ॥ १८ ॥


तिचा पुत्र अतिक्रूर । नाम तया दशशिर ।

आला तेथें वेगवक्त्र । मातादर्शन करावया ॥ १९ ॥


नमिता झाला मातेसी । पुसे पूजा काय करिसी ।

सांगतसे विस्तारेसीं । पूजित्यें लिंग मृत्तिकेचें ॥ २० ॥


रावण म्हणे जननीसी । माझी माता तूं म्हणविसी ।

मृत्तिकेचें लिंग पूजेसी । अभाग्य आपुलें म्हणतसे ॥ २१ ॥


मागुती म्हणे तियेसी । पूजिल्या फळें कायसी ।

कैकया सांगे पुत्रासी । कैलासपद पाविजे ॥ २२ ॥


रावण म्हणे मातेसी । कैलास आणूनि तुजपाशीं ।

दिल्हें तरी होय कैसी । कां वो करित्येसी सायास ॥ २३ ॥


ऐसें म्हणतसे रावण । मातेसवें करी पण ।

आणीन उमारमण । कैलासासहित लंकेसी ॥ २४ ॥


पूजा करीं वो स्वस्थचित्तेसीं । मृत्तिकालिंग असे कायसी ।

म्हणोन निघाला त्वरितेसीं । मनोवेगें निशाचर ॥ २५ ॥


पावला त्वरित सिवपुरासी । शुभ्र पर्वतरम्यासी ।

धरोनि हालवी क्रोधेसीं । वीस बाहुभुजाबळें ॥ २६ ॥


आंदोळलें कैलासभुवन । उपटीतसे तो रावण ।

दाही शिरें टेंकून । उचलीन म्हणे उल्हासें ॥ २७ ॥


शिर लावूनि पर्वतासी । कर टेंकून मांडीसी ।

उचलिता झाला त्राणेसीं । पातळ सप्त आंदोळले ॥ २८ ॥


फडा चुकवी शेष आपण । कूर्म भ्याला कांपोन ।

भयचकित देवगण । अमरपुर कांपतसे ॥ २९ ॥


कंपायमान स्वर्गभुवन । सत्यलोकादि विष्णुभुवन ।

मेरु पडतसे गडबडोन । म्हणती प्रळय मांडला ॥ ३० ॥


कैलासपुरींचे देवगण । भयभीत झाले कांपोन ।

भयचकित गिरिजा आपण । होऊनि गेली शिवापाशीं ॥ ३१ ॥


पार्वती विनवी शिवासी । काय झालें कैलासासी ।

आंदोळतसे भारेसी । पडों पहातें निर्धारी ॥ ३२ ॥


नगरांत झाला आकांत । बैसलेति तुम्ही सावचित्त ।

करावा तुम्ही प्रतिकार त्वरित । म्हणोनि चरणीं लागली ॥ ३३ ॥


ईश्र्वर म्हणे गिरिजेसी । न करीं चिंता मानसीं ।

रावण भक्त माझा परियेसीं । खेळतसे भक्तीनें ॥ ३४ ॥


ऐसें वचन ऐकोनि । विनवी गिरिजा नमोनि ।

रक्ष रक्ष गा शूलपाणि । राखे समस्त देवगणा ॥ ३५ ॥


ऐकोनि उमेची विनंति । शंकरें चेपिलें वामहस्तीं ।

दहा शिरें भुजा विसासहितीं । शिरकला संधिगिरींत॥ ३६ ॥


चिंता करी मनीं बहुत । शिव शिव ऐसें उच्चारीत ।

ध्यातसे स्तोत्र करीत । शरणागता रक्ष म्हणोनि ॥ ३७ ॥


त्राहि त्राहि पिनाकपाणी । जगद्रक्षा शिरोमणी ।

शरण आलों तुझे चरणीं । मरण कैचें भक्तासी ॥ ३८ ॥


शंकर भोळा-चक्रवर्ती । ऐकोनि त्याची विनंति ।

चेपिलें होतें वामहस्तीं । काढिलें त्वरित कृपेनें ॥ ३९ ॥


सुटला तेथूनि लंकेश्र्वर । स्तोत्र करीतसे अपार ।

शिर छेदोनि धरिलें करीं । तंतु लाविले निज अंत्रे ॥ ४० ॥


वेद सहस्त्र एकवटूनि । वर्णक्रमादि विस्तारोनि ।

सामवेद अतिगायनीं । समस्त रागें गातसे ॥ ४१ ॥

गण-रस-स्वरयुक्त । गायन करी लंकानाथ ।

त्यांचीं नामें विख्यात । सांगेन ऐका एकचित्तें ॥ ४२ ॥


आठै गण प्रख्यात । उच्चारीतसे लंकानाथ ।

‘ म ‘ गण ब्राह्मण विख्यात । ‘ न ‘ गण क्षत्रिय विनयेसीं ॥ ४३ ॥


‘ भ ‘ गण वैश्य ध्यानेसीं । ‘ य ‘ गण शूद्रवंश परियेसीं ।

‘ ज ‘ गण दैत्यकुळेसीं । ‘ र ‘ गण प्रेत, राक्षस ‘ त ‘ गण ॥ ४४ ॥


‘ स ‘ गण तुरंगरुपेसीं । आठै गण परियेसीं ।

विस्तारित गायनेसीं । लंकापति रावण ॥ ४५ ॥


गायन करीत नवरसेसीं । नांवें सांगेन परियेसीं ।

शांत-भयानक-अद्भुतेसीं । श्रृंगार-हास्य-करुणरसें ॥ ४६ ॥


रौद्र-वीर-बीभत्सेसीं । गायन करी अति उल्हासीं ।

वीणा वाजवी सप्तस्वरेसीं । ध्यानपूर्वक विधीसी ॥ ४७ ॥


जंबुद्वीप वास ज्यासी । ‘ षड्ज ‘ स्वर नाम परियेसीं ।

कंठीहूनि उपज ज्यासी । मयूरस्वरें आलापीत ॥ ४८ ॥


उत्तमयातीं उपज त्यासी । गीर्वाणकुळी ब्रह्मवंशीं ।

पद्मपत्र वर्ण परियेसीं । वन्हि देवता श्रृंगाररसें ॥ ४९ ॥


दि्वतीय स्वर ‘ ऋषभा ‘ सी । जन्म प्लक्षदि्वपासीं ।

उपज हृदयस्थानेसी । चाषश्र्वर ऋषिकुळ ॥ ५० ॥


प्रख्यात जन्म क्षत्रियवंशी । विराजवर्ण यमदेवतेसी ।

क्रीडा अद्भुतरस ऐसी । वीणा वाजवी रावण ॥ ५१ ॥


तृतीय स्वर ‘ गांधारें ‘ सीं । गायन करी लंकाधीशी ।

कुशद्वीप वास ज्यासी । नासिकास्थान अवधारा ॥ ५२ ॥


अजस्वर आलाप त्यासी । गीर्वाणकुळ वैश्यवंशीं ।

सुवर्णवर्ण कांतीसी । चंद्रदेवता अद्भुतरसें ॥ ५३ ॥


‘ मध्यम ‘ स्वर चातुर्थक । क्रौंचद्वीप वास ऐक ।

उरस्थान उच्चारी सुखें । क्रौंचस्वरें आलापीत ॥ ५४ ॥


गीवार्णकुळ ब्रह्मवंश । कुंदवर्ण रुप सुरस ।

ध्यान करी लंकाधीश । लक्ष्मीदेवता करुणारसें ॥ ५५ ॥


शाल्मली-द्वीप भूमीसी । जन्म ‘ पंचम ‘ स्वरासी ।

कंठींहून उपज नादासी । कोकिळास्वरें गातसे ॥ ५६ ॥


ध्यान करी तया स्वरासी । उपज झाला पितृवंशीं ।

कृष्णवर्ण रुप त्यासी । गणनाथ देव हास्यरसें ॥ ५७ ॥


श्वेतद्वीप जन्म ख्यात । स्वर असे नाम ‘ धैवत ‘ ।

ललाट स्थान नाद व्यक्त । दर्दुरस्वरें आलापी देखा ॥ ५८ ॥


ऋषिकुळ उत्तमवंशी । जन्म आहे ध्यानेसीं ।

पीतवर्ण रुप त्यासी । नारदगणेश देव देखा ॥ ५९ ॥


ऐसें ‘ धैवत ‘ स्वरासी । बीभत्सरस अतिउल्हासीं ।

गायन करी भक्तीसीं । लंकानाथ शिवाप्रती ॥ ६० ॥


पुष्करद्वीप उपज ज्यासी । ‘ निषाद ‘ स्वर नाम परियेसीं ।

उत्पत्ति तालव्य संधीसी । हस्तिस्वरें गातसे ॥ ६१ ॥


असुरवंश वैश्यकुळीं । कल्प शुद्ध वर्ण पाटली ।

तुंबर मुनि देवता जवळी । सूर्य-देवता अवधारीं ॥ ६२ ॥


भयानकरसें देखा । चर्ची व्याकळ असे निका ।

येणेंपरी सप्त स्वरिका । गायन करी लंकानाथ ॥ ६३ ॥


रागसहित रागिणींसी । गायन करी सामवेदासी ।

श्रीरागादि वसंतासी । आलाप करी दशशिर ॥ ६४ ॥


भैरवादि पंचमरागी । नटनारायण मेघरागी ।

गायन करी अभ्यासयोगी । लंकानाथ शिवाप्रति ॥ ६५ ॥


गौडी कोल्हाळी आंधाळी । द्राविडरागी कौशिकमाळी ।

देवगांधार आंनदलिळी । गायन करी लंकानाथ ॥ ६६ ॥


धनाश्रिया वराडीसी । रामकिया मंजरीसीं ।

गौडकी देशाक्षी हारीसी । गायन करी लंकेश्र्वर ॥ ६७ ॥


भैरवी गुर्जरीसहित । वेळावली राग ललित ।

कर्णाटकी हंसयुक्त । गायन करी दशशिर ॥ ६८ ॥


त्रोटकी मोटकी देखा । टंकाक्षी सुधा नाटिका ।

सैंधवी मालवी ऐका । गायन करी लंकानाथ ॥ ६९ ॥


बंगाली राग सोरटीसी । कामबोध मधुमाधवीसी ।

देवक्रिया भूपाळीसी । गायन करी दशानन ॥ ७० ॥


राग वल्लभ माधुरीसी । राव्हेरी राग हर्षी ।

विहंगदात्री चंडीसी । वसवीजादि रागानें ॥ ७१ ॥


शिर कापून आपुलें देखा । यंत्र केलें करकमळिका ।

नर काढून तंतुका । रावणेश्र्वर गातसे ॥ ७२ ॥


समयासमयीं आलापन । करी दशशिर आपण ।

प्रातःकाळीं करी गायन । अष्टरागें परियेसा ॥ ७३ ॥


मध्यमराग वेळावली । देशाख्य भैरवी भूपाळी ।

मल्हार धनाश्री बंगाली । प्रातःकाळी गातसे ॥ ७४ ॥


बराडी ललिता गु्र्जरीसी । गौडक्री आहीरी कौशिकेसीं ।

माध्यान्हसमयीं गायनासी । रावण करी परियेसा ॥ ७५ ॥


कुरंजी तोडी मालाश्रियेसी । देशाख्य पंचम परियेसीं ।

अपराण्ह वेळ अतिहर्षी । ईश्र्वराप्रती गातसे ॥ ७६ ॥


चार प्रहरीं गौडियेसी । रामकली श्रीरागासी ।

देवक्री पटमंजिरेसीं । वसंतुरागें ऋतुकाळीं ॥ ७७ ॥


ऐसें छत्तीस रागेसीं । गायन करी सामवेदासी ।

निर्वाणरुप आहे कैसी । चंद्रमौळीची भक्ति ते ॥ ७८ ॥


रावणाचे भक्तीसी । प्रसन्न ईश्र्वर त्वरितेसीं ।

निजरुपें अतिहर्षी । उभा राहिला सन्मुख ॥ ७९ ॥


पंचवक्त्र त्रिनेत्रेसीं । दहा भुजा स्वरुपेसी ।

उभा राहोनि संतोषीं । माग वर म्हणतसे ॥ ८० ॥


म्हणे रावण शिवासी । काय मागूं तुजपाशीं ।

लक्ष्मी माझे घरची दासी । अष्टै निधि माझे द्वारी ॥ ८१ ॥


चतुरानन माझा ज्योतिषी । तेहतीस कोटी देव हर्षी ।

सेवा करिताति आम्हांसी । सूर्य चंद्र वरुण वायु ॥ ८२ ॥


अग्नीसारिखा सेवा करी । वस्त्रें धूतसे आतिकुसरीं ।

यम माझा आज्ञाधारी । निरोपावेगळा न मारी कवणा ॥ ८३ ॥


इंद्रपराभविता पुत्र । कुंभकर्णासारिखा भ्रात ।

स्थान माझें समुद्रांत । कामधेनु माझ्या घरीं ॥ ८४ ॥


सहा कोटी आयुष्य मज । मजसमान नाहीं दुजा ।

आलों असें याचि काजा । कैलास नेईन लंकेसी ॥ ८५ ॥


व्रत असे जननीसी । नित्य पूजावें तुम्हांसी ।

मनोरथ पुरवावे भक्तीसी । कृपामूर्ति दातारा ॥ ८६ ॥


ईश्र्वर म्हणे रावणासी । जरी चाड असेल पूजेसी ।

काय करिसी कैलासासी । प्राणलिंग देईन तुज ॥ ८७ ॥


जे जे मनींची वासना । पुरेल ऐसें जाण ।

लिंग असे माझा प्राण । म्हणोनि दिलें रावणासी ॥ ८८ ॥


पूजा करी वेळ तीन्ही । अष्टोत्तर शत जप करोनि

रुद्राभिषेकेंकरोनि । पूजा करीं एकचित्तें ॥ ८९ ॥


वर्षे तीन जरी पूजिसी । तूंचि माझें स्वरुप होसी ।

जें जें मनीं इच्छिसी । पावसी त्वरित अवधारीं ॥ ९० ॥


हें लिंग असेल जयापाशीं । मृत्यु नाहीं परियेसीं ।

दर्शनमात्रें नित्य दोष । त्वरित जातील अवधारीं ॥ ९१ ॥


ठेवूं नको भूमीवरी । जंव पाविजे तुझी नगरी ।

वर्षें तीन पूजा करीं । तूंचि ईश्र्वर होशील ॥ ९२ ॥


वरु लाधला लंकेश्र्वरु । केला साष्टांग नमस्कारु ।

निरोप दिधला कर्पूरगौरु । निघाला त्वरित लंकेसी ॥ ९३ ॥


इतुकें होतां अवसरीं । नारद होता ऋषेश्र्वर ।

निघोनि गेला वेगवत्तर । अमरपुरीं इंद्रभुवना ॥ ९४ ॥

नारद म्हणे इंद्रासी । काय स्वस्थचित्तें बैसलासी ।

अमरत्व दिधले रावणासी । लक्ष्मी नेली आजि तुमची ॥ ९५ ॥


चिरायु झाला लंकेश्र्वर । प्राणलिंग दिधलें कर्पूरगौरें ।

आणिक दिधला असे वर । ” तूंचि ईश्र्वर होशील ॥ ९६ ॥


वर्षें तीन पूजिलियासी । तूंचि माझें स्वरुप होसी ।

तुझी नगरीच कैलासी । मृत्यु नव्हे कधीं तुज ” ॥ ९७ ॥


ऐसा वर लाधोनि । रावण गेला संतोषोनि ।

तेहतीस कोटी देव कोठूनि । सुटतील आतां तुम्हांसी ॥ ९८ ॥


जावें त्वरित तुम्हीं आतां । सेवा करावी लंकानाथा ।

उर्वशी रंभा मेनका त्वरिता । भेटीस न्यावें रावणासी ॥ ९९ ॥


ऐसें वचन ऐकोनि । इंद्र भ्याला कांपोनि ।

नारदासी विनवी कर जोडूनि । काय करावें म्हणतसे ॥ १०० ॥


नारद म्हणे इंद्रासी । उपाव करावे त्वरितेसीं ।

जावें तुम्हीं ब्रह्मयापाशीं । तो यासी उपाय त्वरित करील ॥ १०१ ॥


इंद्र नारद-समवेत । गेले ब्रह्मलोका त्वरित ।

विस्तारोनि वृत्तांत । सांगे इंद्र ब्रह्मयासी ॥ १०२ ॥


ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी । जावे त्वरित वैकुंठासी ।

दैत्यावरी हृषीकेशी । उपाव करिल निर्धारी ॥ १०३ ॥


म्हणोनि निघाले तिघेजण । पावले त्वरित वैकुंठभुवन ।

भेटी जाहली नारायण । सांगती वृत्तांत रावणाचा ॥ १०४ ॥


विरिंचि म्हणे विष्णूसी । प्रतिकार करा वेगेसी ।

कारण असे तुम्हांसी । राम-अवतारीं परियेसा ॥ १०५ ॥


तेहतीस कोटी देवांसी । घातलें असे बंधनेसी ।

याचिकारणें तुम्हांसी । कारण असे अवधारा ॥ १०६ ॥


ईश्र्वराचें प्राणलिंग । घेऊनि गेला दैत्य चांग ।

आतां रावण अभंग । तोचि ईश्र्वर होईल ॥ १०७ ॥


त्वरित उपाव करावा यासी । पुढें जड होईल तुम्हांसी ।

निर्दाळावया राक्षसांसी । अवतरोनि तुम्हींच यावें ॥ १०८ ॥


ऐसें विनवी चतुरानन । तंव श्रीविष्णु म्हणे कोपोन ।

कार्य नासिलें म्हणोन । निघाला झडकरी कैलासासी ॥ १०९ ॥


विष्णु आला ईश्र्वरापाशीं । म्हणे शंकरा काय करिसी ।

प्राणलिंग रावणासी । देणें काय कारण तुम्हां ॥ ११० ॥


रावण क्रूर महादैत्य । सुरवर सकळ त्याचे भृत्य ।

कारागृहीं असती समस्त । केवीं सुटती सांग आम्हां ॥ १११ ॥


ऐशा दुराचारियासी । वर देतां तुम्ही कैसी ।

देवत्व गेलें त्याचिया घरासी । घेईल स्वर्ग निर्धारीं ॥ ११२ ॥


ईश्र्वर म्हणे विष्णूसी । तुष्टलों त्याचे भक्तीसी ।

विसर पडिला आम्हांसी । संतोषोनि दिधलें प्राणलिंग ॥ ११३ ॥


आपलें शिर छेदोनि देखा । वीणा केला स्वहस्तिका ।

सप्तस्वरें वेदादिका । गायन केलें भक्तीनें ॥ ११४ ॥


जरी मागता पार्वतीसी । देतों सत्य परियेसी ।

भुली पडली भक्तीसी । लिंग नेलें प्राण माझें ॥ ११५ ॥


विष्णु म्हणे उमाकांता । तुम्ही ऐसे वर देतां ।

आम्हांसी होय बहुता । दैत्य उन्मत्त होताति ॥ ११६ ॥


देवदि्वजादि लोकांसी । पीडा करिताति बहुवसीं ।

याचिकारणें आपणांसी । अवतार घेणें घडतें देखा ॥ ११७ ॥


कधीं दिधलें लिंग त्यासी । नेलें असेल लंकेसी ।

शंकर म्हणे विष्णूसी । पांच घटी झाल्या देखा ॥ ११८ ॥


ऐकतांचि शिववचन । उपाय केला नारायणें ।

चक्र पाठविलें सुदर्शन । सूर्याआड व्हावयासी ॥ ११९ ॥


बोलावूनि नारदासी । सांगतसे हृषीकेशी ।

तुम्हीं जावें त्वरितेसीं । जातो लंकेसी रावण ॥ १२० ॥


मार्गी जाऊनि त्यासी । विलंब परियेसीं ।

जाऊं न द्यावें लंकेसी । त्वरित जावें म्हणतसे ॥ १२१ ॥


चक्र झाले सूर्याआड । स्नानसंध्या रावणा चाड ।

तुम्ही जाऊनियां दृढ । विलंब करावा तयासी ॥ १२२ ॥


ऐसें ऐकोनियां बोला । नारदमुनि त्वरित गेला ।

मनोवेगें पावला । मार्ग क्रमितां लंकानाथ ॥ १२३ ॥


नारदातें पाठवूनि । विष्णु विचारी आपुले मनीं ।

गणेश्र्वरातें विनवूनि । पाठवूं म्हणे विघ्नासी ॥ १२४ ॥


बोलावूनि गणेशासी । सांगे विष्णु विनयेसीं ।

” कैसा रावण परियेसीं । तूंतें सदा उपेक्षितो ॥ १२५ ॥


सकळ देव तुज वंदिती । त्यांचे मनोरथ पुरती ।

तुज जे जन उपेक्षिती । विघ्न होय तयांसी ॥ १२६ ॥


तुज नेणतां रावण देखा । घेऊन गेला निधान ऐका ।

प्राणलिंग अतिविशेषा । नेलें शिवा चाळवूनि ॥ १२७ ॥


आतां तुवां करणें एक । रावणापाशीं जावें ऐक ।

कपटरुपें व्हावें कुब्जक । बाळवेष धरुनि ॥ १२८ ॥


वाटेसि होईल अस्तमान । रावण करील संध्यावंदन ।

नारद गेला याचिकारण । विलंब करावया रावणासी ॥ १२९ ॥


आज्ञा शिवाची रावणासी । लिंग न ठेवावें भूमीसी ।

शौचाचमन-समयासी । आपणाजवळीं न ठेवील ॥ १३० ॥


बाळकपणें तुवां जावें । शिष्यरुपें करुणाभावें ।

सूक्ष्मरुप दाखवावें । लिंग घ्यावें विश्र्वासूनि ॥ १३१ ॥


संध्यासमयीं तुझे हातीं । लिंग देईल विश्र्वासरीतीं ।

तुवां ठेवावें क्षितीं । लिंग राहील तेथेंचि ॥ १३२ ॥


येणेंपरी गणेशासी । शिकवी विष्णु परियेसीं ।

संतोषोनि महाहरुषीं । भातुकें मागे तये वेळीं ॥ १३३ ॥


लाडू तिळवे पंचखाद्दें । इक्षु खोबरें दाडिमाद्दें ।

शर्करा घृत क्षीत सद्दें । द्यावें त्वरित आपणासी ॥ १३४ ॥


चणे भिजवूनि आपणासी । तांदूळ लाह्या साखरेसीं ।

त्वरित देणें भक्षणेसी । मजकारणें म्हणतसे ॥ १३५ ॥


जे जे मागे विघ्नेश्र्वर । त्वरित देत शार्ङ्गधर ।

भक्षीत निघाला वेगवक्त्र । ब्रह्मचारीवेष धरुनि ॥ १३६ ॥


गेला होता नारद पुढें । ब्रह्मऋषि महा गाढे ।

उभा ठेला रावणापुढें । म्हणे कोठूनि आलासी ॥ १३७ ॥


रावण म्हणे नारदासी । गेलों होतों कैलासासी ।

केलें उत्सर्ग तपासी । संतोषविलें चंद्रमौळी ॥ १३८ ॥


प्रसन्न होऊनियां आम्हांसी । लिंग दिधलें परियेसीं ।

आणिक सांगितलें संतोषी । लिंगमहिमा अपार ॥ १३९ ॥


नारद म्हणे “लंकानाथा । दैव अधिक तुझें आतां ।

लिंग लाधलासि अद्भुता । जाणों आम्ही आद्यंत ॥ १४० ॥


दाखवीं लिंग आम्हां कैसी । खूण जाणें परियेसीं ।

लिंगलक्षण तुम्हांसी । सविस्तारें सांगेन ” ॥ १४१ ॥


नारदाच्या बोलासी । विश्र्वास न करी परियेसी ।

दाखवी दुरुनि करेसीं । व्यक्त करोनि लिंग तयेवेळीं ॥ १४२ ॥


नारद म्हणे लंकेशा । लिंगमहिमा-प्रकाशा ।

सांगेन ऐक बहुवसा । कथा ऐकें बैसोनियां ॥ १४३ ॥


लिंग उपजलें कवणे दिवशीं । जाणें आपण पूर्वापरेसीं ।

एकचित्तें परियेसीं । कथा असे अपूर्व एक ॥ १४४ ॥


गिळून सकळ सैरिभांसी । मृग एक काळाग्निऐसी ।

ब्रह्मांडखंड परियेसीं । पडिला होता तो मृग ॥ १४५ ॥


ब्रह्माविष्णुमहेश्र्वरांसी । गेले होते पारधीसी ।

मृग मारिला परियेसीं । भक्षिलें मेद तये वेळीं ॥ १४६ ॥


त्यासी होतीं तीन शिंगे । त्याखालीं होती तीन लिंगें ।

तिघीं घेतलीं तीन भागें । प्राणलिंगें परियेसा ॥ १४७ ॥


लिंगमहिमा ऐके कानीं । जे पूजितील वर्षें तीन्ही ।

तेचि ईश्र्वर होतील निर्गुणी । वरदमूर्ति तोचि होय ॥ १४८ ॥


लिंग असेल जये स्थानीं । तेंचि कैलास असें जाणीं ।

महत्व होतें याचिगुणीं । ब्रह्माविष्णुमहेश्र्वरांसी ॥ १४९ ॥


असे आणिक अपार महिमा । सांगेन ऐक एकनेमा ।

रावण म्हणे कार्य आम्हां । जावें त्वरित लंकेसी ॥ १५० ॥


म्हणोनि निघाला महाबळी । नारद म्हणे तये वेळीं ।

सूर्यास्तमान आहे जवळी । संध्याकाळ ब्राह्मणासी ॥ १५१ ॥


सहस्त्रवेद तूं वाचिसी । संध्याकाळीं मार्ग क्रमिसी ।

वाटेसी होईल तुज निशी । संध्यालोप होईल ॥ १५२ ॥


आम्ही राहूं संध्यावंदनासी । म्हणोनि नारद विनयेसीं ।

पुसोनियां रावणासी । गेला नदीसी नारद ॥ १५३ ॥


इतुकिया अवसरीं । गणेश पातला ब्रह्मचारी ।

रावणापुढें चरणचारी । समिधा तोडी कौतुकें ॥ १५४ ॥


रावण चिंती मानसीं । व्रतभंग जाहला आपणासी ।

संध्या करावी त्रिकाळेसीं । संदेह घडला म्हणतसे ॥ १५५ ॥


ईश्र्वरें सांगितलें आपणासी । लिंग न ठेवावें भूमीसी ।

संध्यासमय झाली निशी । काय करुं म्हणतसे ॥ १५६ ॥


तंव देखिला ब्रह्मचारी । अतिसुंदर बाळकापरी ।

हिंडतसे नदीतीरीं । देखिलें रावणें तये वेळीं ॥ १५७ ॥


मग विचारी लंकानाथ । ब्रह्मचारी कुमार दिसत ।

न करील आम्हां विश्र्वासघात । लिंग देऊं तया हातीं ॥ १५८ ॥


संध्या करुं स्वस्थचित्तेसीं । लिंग असेल तयापाशीं ।

बाळक आहे हा निश्र्चितेसीं । म्हणोनि गेला तयाजवळी ॥ १५९ ॥


देखोनियां दशशिर । पळतसे लंबोदर ।

रावण झाला दि्वजवर । ‘ अभय ‘ म्हणत गेला जवळी ॥ १६० ॥


रावण पुसे तयासी । तूं कवण सांग आम्हांसी ।

मातापिता कवण तुजसी । कवण कुळीं जन्म तुझा ॥ १६१ ॥


ब्रह्मचारी म्हणे रावणा । इतुकें पुससी किंकारणा ।

आमुच्या बापें तुज रिणा । काय देणें सांग मज ॥ १६२ ॥


हांसोनियां लंकेश्र्वर । लोभें धरिला त्याचा कर ।

सांग बाळा कवणाचा कुमर । प्रितीभावें पुसतों मी ॥ १६३ ॥


ब्रह्मचारी म्हणे रावणासी । आमुचा पिता काय पुससी ।

जटाधारी भस्मांगेसीं । रुद्राक्षमाळा असे देखा ॥ १६४ ॥


शंकर म्हणिजे नाम तयासी । भिक्षा मागे अहर्निशी ।

वृषभारुढ उमा सरसी । जननी माझी जगन्माता ॥ १६५ ॥


इतुकें कां आम्हां पुसतोसी । तुज देखितां भीति आम्हांसी ।

बहुत होतसे परियेसीं । सोडी कर जाईन ॥ १६६ ॥


रावण म्हणे ब्रह्मचारी । तुझा पिता असे दरिद्री ।

सदा भिक्षा मागे भारी । सौख्य तुज कांही नाहीं ॥ १६७ ॥


आमुचें नगर लंकापुर । रत्नखचित आहेति घर ।

आम्हांसवे चाल कुमरा । देवपूजा करीं सुखें ॥ १६८ ॥


जें जें मागसी आम्हांसी । सकळ देईन परियेसीं ।

सुखें चाल आम्हांसरसी । म्हणे रावण तये वेळीं ॥ १६९ ॥


ब्रह्मचारी म्हणे त्यासी । लंकेसी आहेत बहुत राक्षसी ।

आपण बाळक अरण्यवासी । खातील तेथें मज देखा ॥ १७० ॥


न यें तुझिया नगरासी । सोडीं जाईन घरासी ।

क्षुधें पीडिलों बहुवसी । म्हणोनि भक्षितों भातुकें ॥ १७१ ॥


इतकें ऐकोनि लंकानाथ । त्या बाळकातें संबोखीत ।

लिंग धरीं ऐसें म्हणत । संध्या करीन तंववरी ॥ १७२ ॥


बाळक विनवी तयासी । न धरीं लिंग परियेसीं ।

ब्रह्मचारी आपण अरण्यवासी । उपद्रवूं नको म्हणतसे ॥ १७३ ॥


तुझें लिंग असेल जड । आपण बाळक असें वेडें ।

नेघें लिंग जाईं सोड । धर्म घडेल तुम्हांसी ॥ १७४ ॥


नानापरी संबोखीत । लिंग देत लंकानाथ ।

संध्या करण्या आपण त्वरित । समुद्रतीरीं बैसला ॥ १७५ ॥


ब्रह्मचारी थडीसी । उभा विनवीतसे रावणासी ।

जड झालिया आपणासी । ठेवीन त्वरित भूमीवरी ॥ १७६ ॥


तीन वेळ तुम्हांसी । बोलावीन परियेसीं ।

वेळ लागलिया तुम्हांसी । ठेवीन आपण भूमीवरी ॥ १७७ ॥


ऐसा निर्धार करुनि । उभा गणेश लिंग धरुनि ।

समस्त देव । विमानी बैसोनि पाहती कवतुक ॥ १७८ ॥


अर्घ्यसमयी रावणासी । बोलावी गणेश परियेसीं ।

जड झालें आपणासी । लिंग घे गा म्हणतसे ॥ १७९ ॥


न्यासपूर्वक अर्घ्य देखा । रावण करितो अति विवेका ।

हातीं दाखवितो बाळका । येतों राहें म्हणोनि ॥ १८० ॥


आणिक एक क्षण पाहोनि । गणेश बोले वेळ दोनी ।

जड जाहलें म्हणोनि । शीघ्र यावें म्हणतसे ॥ १८१ ॥


न ये रावण ध्यानस्थ । गणेश असे उच्चारीत ।

समस्त देवीं साक्षी करीत । लिंग ठेविलें भूमीवरी ॥ १८२ ॥


श्रीविष्णूतें स्मरोनी । लिंग ठेविलें स्थापूनि ।

संतोष जाहला गगनीं । पुष्पें वर्षती सुरवर ॥ १८३ ॥


अर्घ्य देऊनि लंकेश्र्वर । निघोनि आला वेगवत्तर ।

मग देखिलें लिंग तत्र । तव भूमीवरी ठेविलें असे ॥ १८४ ॥


आवेशोनि रावण देखा । टोले मारी गणनायका ।

हास्यवदनें रडे तो देखा । भूमीवरी लोळतसे ॥ १८५ ॥


म्हणे माझ्या पितयासी । सांगेन आतां त्वरितेसीं ।

कां मारिलें बाळकासी । म्हणोनि निघाला रडत देखा ॥ १८६ ॥


मग तो रावण काय करी । लिंग धरुनि दृढ करीं ।

उचंलू गेला नानापरी । भूमीसहित हालतसे ॥ १८७ ॥


कांपे धरणी तया वेळी । रावण उचली महाबळी ।

न ये लिंग, शिर आफळी । महाबळी राहिला ॥ १८८ ॥


नाम पावलें याचि कारणें । ‘ महाबळेश्र्वर ‘ लिंग जाणें ।

मुरडोनि ओढितां रावणें । गोकर्णाकार जाहलें देखा ॥ १८९ ॥


ऐसें करुनि लंकानाथ । गेला, मागुती तप करीत ।

ख्याति झाली गोकर्णक्षेत्र । समस्त देव तेथें आले ॥ १९० ॥


आणिक असे अपार महिमा । सांगता असे अनुपमा ।

स्कंदपुराणीं असे विस्तीर्ण महिमा । ख्याति असे त्रिभुवनीं ॥ १९१ ॥


ऐकोनि शिष्य गुरुच्या बोला । नामधारक संतोषला ।

पुनरपि चरणा लागला । म्हणे सरस्वती-गंगाधरु ॥ १९२ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ

श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे

गोकर्णमहिमा-महाबळेश्र्वरलिंगस्थापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

इस अध्याय में, हम देखते हैं कि कैसे एक गरीब ब्राह्मण को गुरु के चरणों में समर्पण करने से सभी मनोकामनाएं पूर्ण होती हैं। ब्राह्मण बहुत गरीब था और उसे अपनी बुनियादी जरूरतें भी पूरा करना मुश्किल था। एक दिन, ब्राह्मण गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने ब्राह्मण को बताया कि वह उसे उसकी सभी मनोकामनाएं पूर्ण करा देंगे। गुरु ने ब्राह्मण को अपने चरणों में समर्पण करने और उनकी आज्ञा का पालन करने की सलाह दी। ब्राह्मण ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु की कृपा प्राप्त की। गुरु की कृपा से ब्राह्मण की सभी मनोकामनाएं पूर्ण हुईं और वह सुखी जीवन जीने लगा।

श्री गुरु चरित्र के सभी अध्याय